वायंगणी गावचे माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : वानर, माकड, लाल तोंडाची माकड (केडली) हत्ती, गवारेडा यांचेपासून शेतीचे नुकसान थांबवावे, अशी मागणी मालवण तालुक्यातील वायंगणी गावचे माजी उपसरपंच हनुमंत प्रभू यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. देण्यात आलेल्या निवेदनात सध्या कोकणामध्ये वन्य प्राण्यांपासून फार मोठे शेतीचे नुकसान होत आहे. प्रामख्याने यामध्ये वानर, लाल तोंडाची माकडे (केडली) हत्ती, गवारेडा यांचेपासून शेती बागायती पिकांचे फार मोठे नुकसान होत आहे. त्याच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी कमिटीसुध्दा नेमण्यात आलेली असल्याचे समजते. या कमिटीमध्ये सुदैवाने कोकणचे आ नितेश राणे यांचासुध्दा समावेश असल्याचे समजते. मात्र, कमेटीचा अहवाल प्राप्त होवून पुढील काय कार्यवाही झाली याबाबतचा प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्यावर तातडीने उपाययोजना अंमलात आणणे आवश्यक आहे. सध्या शेतकरी वन्य प्राण्यांपासून हवालदिल झालेले आहेत. हा प्रश्न तातडीने हाती घेवून सोडविणे आवश्यक आहे.
त्यासाठी माकडांची धरपकड करून त्यांना जंगलात नेवून सोडणे. नरमादी दोघांचीही नसबंदी करणे. हे शक्य नसेल तर उपद्रव थांबविण्यासाठी त्यांना मारण्याची शेतक-यांना परवानगी देण्यात यावी. या उपाययोजना केल्यास काही प्रमाणात तरी हा प्रश्न सुटू शकेल असे मला वाटते. माकड, वानर याप्रमाणेच हत्ती, गवारेडा यांच्यापासूनही शेतीचे फार मोठे नुकसान होते. दरवर्षी आपण किती शेतक-यांना नुकसान भरपाई देत राहणार. याकरिता यावर कायम स्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे असे आम्हाला वाटते. याची त्वरीत कारवाई, अशी नोंद करण्यात आली आहे.