ओरोस (प्रतिनिधी) : आज दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे कार्यालय समोर सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सर्व मालक सभासदांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. वेंगुर्ला शाखेतील कथित अपहाराला काही महिने झाले तरीही संचालक मंडळाच्या वतीने कोणतीही ठोस कार्यवाही व कारवाई करण्यात येत नाही ,याचा मालक सभासदानी तीव्र शब्दात उल्लेख केला .आज संपूर्ण जिल्ह्यातील शेकडो मालक सभासद चिंताग्रस्त झालेले आहेत असे असताना सुद्धा संचालक मंडळ मालक सभासदांच्या मागणीचा विचार न करता अपहाराचा विषय दरवर्षी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आर्थिक व्यवहार माहिती देणे या पुरवणी विषयात घेऊन चर्चा करण्यासाठी ठेवत आहे .मात्र आर्थिक व्यवहाराची माहिती म्हणजे नेमकं काय? पतसंस्थेमध्ये आर्थिक व्यवहार नसतो काय ? ती तर दरवर्षीच वार्षिक सभेमध्ये होत असते. 2022 पासून अपहार झालेला असूनही अशा रकमेचा भरणा सुमारे 45 लाख करून घेऊनही माहिती कसली देता? असा प्रश्न मालक सभासदांनी विचारलेला आहे.
यासाठी विशेष सभा घेऊन सर्व मालक सभासदांच्या समोर संपूर्ण अपहाराची माहिती देण्याच्या मागणीवर मालक सभासद ठाम असून यासाठी सहकार आयुक्त यांचेकडे दाद मागण्याची व गुन्हा दाखल करण्याची तयारी आहे. ती वेळ येवू नये असे ठामपणे सांगण्यात आले. लपवा लपवी बंद करा , संचालक व कर्मचारी यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नसून रात्रंदिवस शाखेत चाललेला रात्रीस़ खेळ चाले , आधी बंद करा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सिंधुदुर्ग यांनी आंदोलन कर्त्याना भेट देऊन मागणी ऐकून घेतली तसेच यासंबंधी प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सिंधुदुर्गनगरीची विशेष सर्वसाधारण सभा घेण्याचे आश्वासित केले .त्यासाठी मंगळवारी सकाळी कार्यालयामध्ये आपण प्रत्यक्ष कार्यवाही करू असे सांगितले.