समाजाच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होत नाही-: उपशिक्षणाधिकारी शेर्लेकर

कासार्डे माध्यमिक विद्यालयात ‘लीलाविश फाउंडेशनच्यावतीने’ २.५ लाखाच्या शिष्यवृत्तीचे वाटप

तळेरे (प्रतिनिधी) : मातृ-पितृ,गुरु आणि समाज ऋणात आपण सतत वावरत असतो आणि यापैकी कोणत्याही ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, खरोखरच तुम्ही भाग्यवान आहात की, तुमच्या शैक्षणिक वाटचालीत लीलाविश फाउंडेशन तुमच्या पाठीशी उभी आहे.या फाउंडेशनने दिलेली रक्कम तुम्ही बचत करा अथवा गरज भासल्यास योग्य त्या शैक्षणिक कामासाठी वापरा असे आवाहन प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी श्री शेर्लेकर यांनी कासार्डे माध्यमिक विद्यालयात केले.

लीलाविश फाउंडेशनच्यावतीने प्रशालेलील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी प्रत्येकी पाच हजार रुपये शिष्यवृत्ती वितरण करण्यात येते या शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून श्री. शेर्लेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे होते. याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ मुंबईचे सहसचिव आनंद कासार्डेकर, पदाधिकारी रवींद्र पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, स्थानिक व्यवस्था समितीचे पदाधिकारी रवींद्र गणपत पाताडे,लीलीविश फाऊंडेशनचे प्रतिनिधी बबन नारकर, संस्था पदाधिकारी दिपक गायकवाड, मुख्याध्यापिका सौ बी.बी.बिसुरे, पर्यवेक्षक एस.व्ही.राणे, अरविंद कुडतरकर, आनंद कासार्डेकर,लीलाविश प्रतिनिधी बबन नारकर आदींनीही मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घेऊन शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्याचे व शिष्यवृत्ती रक्कम बचत करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाताडे म्हणाले की,कासार्डे विद्यालयात गेली अनेक वर्षे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण करणा-या लीलाविशच्या नारकर बंधूंचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांनी याशिष्यवृत्तीचे पैसे शैक्षणिक उन्नती करीताच खर्च करावे. तसेच विद्यार्थ्यीदशेनंतर पुढे सामाजिक बांधिलकी राखत लीलाविश सारखेच आपणही कार्य करावे असेही त्यांनी आवाहन विद्यार्थ्यांना केले. दरम्यान मान्यवरांच्या शुभहस्ते प्रशालेतील 50 विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेच्या मुख्याध्यापिका बी.बी. बिसुरे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.व्ही राऊळ यांनी केले.शेवटी प्रशालेचे पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. याशिष्यवृत्ती वितरण समारंभाला पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!