वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आखवणे येथे विज्यांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसात लक्ष्मण शंकर ढवण या शेतकऱ्यांच्या घरावर वीज कोसळून मोठे नुकसान झाले आहे.ही घटना शनिवारी रात्री 1.30 वाजण्याच्या सुमास घडली. सुदैवाने घरात कोणीही नसल्यामुळे मनुष्यहानी टळली आहे.
शनिवारी रात्री विजाच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. लक्ष्मण ढवण यांची दोन घरे असल्यामुळे रात्री झोपण्यासाठी ते बाजूलाच असलेल्या दुसऱ्या घरात कुटूंबासह जातात. त्याप्रमाणे घर बंद करून ते झोपण्यासाठी गेले. मध्यरात्री विजांचा मोठा आवाज झाला. त्यामुळे जवळपास कुठे तरी वीज पडल्याची त्यांना जाणीव झाली. सकाळी त्यांनी आपल्या घराकडे जाऊन पाहिले असता, घराची कौले फुटल्याची दिसली. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घराचे छप्पराचे वासे तसेच लाकडी बार विजेच्या धक्याने पेचुन नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पोलीस पाटील संतोष गुरव, कोतवाल सुनील पडिलकर यांनी पाहणी करून त्याचा अहवाल दिला आहे.