शिवाजी महाराज पुतळा उभारणी आणि राजकोट किल्ला सुशोभीकरण कामात सुरुवातीपासूनच भ्रष्टाचार ; आमदार वैभव नाईक आक्रमक

पिडबल्युडी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा

बगलबच्चयाना काम देण्यासाठी मजूर सोसायट्याना दिले ठेके

अननुभवी जयदीप आपटेला पुतळा उभारणी काम देण्यामागे रवींद्र चव्हाणांचा हात

कणकवली (प्रतिनिधी) : मालवण राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीबाबत सुरुवातीपासून भ्रष्टाचार झाला होता. राजकोट किल्ला सुशोभीकरण काम नोंदणीकृत ठेकेदाराला काम देण्यापेक्षा स्वतःच्या भाजपाच्या कार्यकर्त्यांना ठेका देण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचे 8 ठेके मजूर सोसायटी ना देण्यात आले.ह्या सर्व मजूर सोसायट्या पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे बगलबच्चे आहेत. शिवराय पुतळा उभारणीचे काम दिलेले जयदीप आपटे हे कल्याण येथील स्वतःच्या मतदारसंघातील असल्याने पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना नेव्हीकडून पुतळा उभारणी चे काम दिले. पुतळा उभारणीचा अनुभव नसलेल्या जयदीप आपटे यांना हा ठेका कोणाच्या सांगण्यावरून दिला हे जनतेसमोर येणे गरजेचे आहे. पंचधातु चा हा शिवरायांचा पुतळा आहे असे आधी सांगण्यात येत होते, मात्र तो पुतळा पंचधातुचा नव्हे तर लोखंडी असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या दुर्घटनेला पिडबल्युडी खाते जबाबदार असून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ठाकरे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. जोपर्यंत रवींद्र चव्हाण राजीनामा देणार नाहीत तोवर आमचे आंदोलन सुरूच राहील असे आमदार वैभव नाईक म्हणाले. एरव्ही पोटतिडकीने बोलणारी राणे कंपनी ने या दुर्घटनेवर तोंड शिवले आहे काय ? असा खोचक सवाल आमदार वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणेंसह आमदार नितेश राणे माजी खासदार निलेश राणेंना केला. शिवपुतळ्या च्या दुर्घटनेनंतर संतप्त आमदार वैभव नाईक यांनी मालवण मध्ये पिडबल्युडी ऑफिस फोडले होते. याबाबत आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत विचारले असता छत्रपतींचा अवमान आम्ही सहन करणार नाही.अशा वेळी गुन्हे दाखल झाले तरी बेहत्तर असे आमदार नाईक म्हणाले. शिवपुतळा दुर्घटनेविरोधात उद्या मालवण मध्ये जनमोर्चा आयोजित करण्यात आला असून या मोर्चात शिवप्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन ही आमदार वैभव नाईक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!