सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गातील भजन मंडळे गणेशोत्सव असो वा अन्य धार्मिक कार्यक्रम यात भजनी मंडळे मोठ्या उत्साहाने भजन सादर करून ही कला जोपासत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या कलेकडे तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी जिल्हा परिषदेची भजनी मंडळांना भजनी साहित्य पुरविणे योजना प्रभावी ठरत आहे. या योजनेला भविष्यात अधिकचा निधी देऊन जास्तीत जास्त भजन मंडळांना लाभ देण्याचा प्रयत्न केला जाईल. असे आश्वासन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज भजन साहित्य वितरण कार्यक्रमात बोलताना दीले.
जिल्हा परिषद छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी, भजन मंडळ सभासद उपस्थित होते.
जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागामार्फत गेल्यावर्षी पासून राबविण्यात येणाऱ्या भजन साहित्य पुरविणे योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.२५०० हुन अधिक अर्ज आले होते . त्यासाठी केवळ २५ लाख निधीची तरतूद असल्याने २५० भजन मंडळाना लाभ दिला होता. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी या योजनेसाठी ४० लाख निधीची भरीव तरतूद करण्यात आली होती . यावर्षी जिल्ह्यातून ६०२ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावतून सोडत पद्धतीने जिल्ह्यातील ५० जिल्हा परिषद मतदार संघातून प्रत्येकी ६ भजनी मंडळांची निवड करण्याचे निश्चित करून एकूण २९७ भजनी मंडळांची निवड करण्यात आली होती. या मंडळांना भजनी साहित्य संच दिला जात असून यात एक मृदुंग, ५ टाळ, १ झांज यांचा समावेश आहे.
आज या भजन साहित्य पुरविणे या योजनेच्या साहित्य वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषद शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाला .यावेळी सर्वांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात जिल्ह्यातील १० भजनी मंडळांना भजनी साहित्याचे वाटप करण्यात आले. तर उर्वरित निवड झालेल्या २८७ भजन मंडळांना तालुकास्तरावर गणेश चतुर्थी पूर्वी हे साहित्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी यावेळी सांगितले.