जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

प्रकाश नारकर, किशोर कदम, सुनील करडे, संदीप सावंत, नम्रता गोसावी, मधुकर शिंदे, शीतल देवरकर, शीतल परुळेकर याना पुरस्कार जाहीर

ओरोस (प्रतिनिधी) : ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने २०२४ या शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी एक या प्रमाणे एकूण आठ शिक्षकांचा यात समावेश असून ५०० रुपये, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. लवकरच या पुरस्कारांचे वितरण सन्मानपूर्वक करण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ गणपती कमळकर यांनी दिली.

या पुरस्कारांना कोकण आयुक्त यांनी मान्यता दिली आहे. जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करीत आयुक्तांकडे मान्यतेसाठी पाठविली होती. यासाठी एकूण १७ प्रस्ताव प्राप्त झाले होते. यात देवगड, दोडामार्ग, मालवण या तालुक्यातून एकच प्रस्ताव आला होता. सर्वाधिक प्रस्ताव सावंतवाडी तालुक्यातून पाच प्रस्ताव आले होते. त्या पाठोपाठ कणकवली ३, कुडाळ, वैभववाडी, वेंगुर्ला तालुक्यातून प्रत्येकी दोन प्रस्ताव आले होते. त्यातून उत्कृष्ट शिक्षक यांची निवड करण्यात आली आहे.

या जाहीर झालेल्या उत्कृष्ट शिक्षक २०२४ या पुरस्कारांमध्ये कणकवली तालुक्यातून ओसरगाव नंबर १ शाळेचे पदवीधर शिक्षक किशोर कदम, सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव नंबर ४ चे उपशिक्षक सुनील करडे, दोडामार्ग तालुक्यातील सासोली हेदुस शाळेचे उपशिक्षक संदीप सावंत, वेंगुर्ला तालुक्यातील वेतोरे नंबर १ शाळेच्या उपशिक्षिका नम्रता गोसावी, कुडाळ तालुक्यातील वाडोस नंबर १ शाळेचे पदवीधर शिक्षक मधुकर शिंदे, देवगड तालुक्यातील रामेश्वर शाळेच्या उपशिक्षक शीतल देवरकर, वैभववाडी तालुक्यातील विद्यामंदिर उपळे नंबर १ शाळेचे पदवीधर शिक्षक प्रकाश नारकर, मालवण तालुक्यातील पेंडूर खरारे शाळेच्या उपशिक्षिका शीतल परुळेकर या शिक्षकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!