प्रसाद करलकर यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : शासकीय रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या वाहन चालकांना देण्यात आलेला निरंतर २४ तास सेवेचा कार्यभार कमी करावा. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात ३ वाहन चालकांची नियुक्ती करून शासकीय कामकाजाच्या वेळेनुसार ८ तास सेवा कार्यभार द्यावा. या मागणीसाठी वेंगुर्ला तालुक्यातील कोचरा येथील सामाजिक कार्यकर्ता प्रसाद करलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
सामाजिक कार्यकर्ता प्रसाद करलकर यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून २४ तास आरोग्य सेवा दिली जात आहे. शासकीय कामकाजाची वेळ ८ तासाची असल्याने एका कर्मचाऱ्याकडून २४ तास सेवा करून घेणे योग्य नाही. आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेचा भाग असल्याने प्रत्येक कर्मचाऱ्याला ८ तास सेवा देणे बंधनकारक आहे असे असताना आरोग्य विभागाकडील रुग्णवाहिकांवर कार्यरत असलेल्या वाहन चालकांना निरंतर २४ तास सेवा द्यावी लागत आहे. यामुळे भविष्यात अपघात घडला, रुग्ण अथवा त्याच्या नातेवाईकांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण ?असा प्रश्न उपस्थित केला आहे.तरी शासकीय रुग्णवाहिकांवर सेवा देणाऱ्या वाहन चालकांना देण्यात आलेला निरंतर २४ तास सेवेचा कार्यभार कमी करावा. त्यांना ८ तास सेवा निश्चित करून सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वाहन चालकांची नियुक्ती करावी. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रसाद करलकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.