शिवसेना नेते रवींद्र फाटक यांनी दिले नियुक्तीपत्र
कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुखपदी कणकवली चे मेहुल उत्तम धुमाळे यांची (कणकवली देवगड आणि वैभववाडी तालुका विधानसभा मतदारसंघ) नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते मेहुल धुमाळे याना ठाणे येथे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युवासेना राज्यसचिव राहुल लोंडे, राज्य समन्वयक विराज म्हामुनकर, कोकण निरीक्षक राहुल अवधाडे, माजी नगरसेवक बाळा चिंदरकर, दीपक वेतकर, मानस चिंदरकर, नितेश मेस्त्री आदी उपस्थित होते. शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार मेहुल धुमाळे यांची युवासेना जिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. मेहुल धुमाळे यांनी रक्तदान शिबिरासह अन्य सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवासेनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबविलेल्या समाजोपयोगी योजना जनमाणसांत पोचवून जनतेच्या विकासात्मक कार्याला जोर देणार आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पक्षसंघटना मजबूत करून युवा वर्गाला पक्षाशी कनेक्ट करण्यावर भर देणार असल्याचे नूतन युवासेना जिल्हाप्रमुख मेहुल धुमाळे यांनी सांगितले.














