मसूरेत पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू !

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या हडकर कुटुंबावर काळाचा घाला 

मसुरे ( प्रतिनिधी) :  मसुरे देऊळवाडा प्राथमिक शाळे नजिक पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली. पाण्यात पडलेली पत्नी पाहून पतीचा हृदयवीकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे.  गणेशोत्सवासाठी गुरुवारी सकाळी मुंबई वरून गावी आलेले बिपीन प्रभाकर हडकर ( 51 वर्ष ) यांचा हृदयविकाराच्या धक्याने तर पत्नी उषा बिपीन हडकर ( 48 वर्ष ) यांचा शौचालयाच्या टाकीत पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

मसुरे कावावाडी तर येथे मूळचे राहिवासी असलेले बिपीन हे नोकरीं निमित्त मुंबई येथे असतात. आपली पत्नी व आई यांच्या  सह गणेशोत्सवासाठी गुरुवारीच सकाळी मुंबई वरून आले होते. देऊळवाडा येथे त्यांनी जमीन विकत घेऊन चार वर्षांपूर्वी नवीन घर बांधले होते. गुरुवारी दुपारी जेवण वैगरे झाल्या नंतर 3 वाजण्याच्या सुमारास उषा या साफसफाई करण्यासाठी अंगणात गेल्या होत्या. बराचवेळ झाला तरी पत्नी कुठे दिसत नसल्याने बिपीन यांना वाटले कि पत्नी मसुरे येथे गेली असेल. त्यामुळे त्यांनी मसुरे येथील नातेवाईकांकडे फोनद्वारे सायंकाळी सवासहाच्या सुमारास  चौकशी सुद्धा केली. दरम्यान त्यांनी घरासभोवताली शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सोबत बिपीन यांच्या बहिणीच्या दोन छोट्या मुली सुद्धा होत्या.

 घराच्या मागच्या बाजूला ते गेले असता शौचालयाच्या टाकी वरील कडपा  दगड तुटलेला दिसून आला. म्हणून त्यांनी टाकीमध्ये पहिले असता पत्नी टाकीतील पाण्यात पडलेली दिसली. टाकीमध्ये झाडू आणि चप्पल सुद्धा दिसून येत होते. यावेळी त्यांनी पत्नीला पाण्याबाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला. बिपीन यांची काही दिवसा पूर्वीच एन्जोप्लास्टी  झाली होती. व औषधपचार चालू होते.

 दरम्यान समोरील दृश्य पाहून ते सुद्धा टाकी लगतच असलेल्या रानात कोसळले. हे पाहून छोट्या मुलीनी आरडा ओरडा केल्यावर बिपीन यांच्या आईने याबाबत मुंबई येथे फोन केला व कुणाला तरी घरी पाठवण्यास सांगितले. येथील दाजीबा परब यांना फोनद्वारे माहिती मिळताच त्यांनी त्वरित घरी येत बिपीन यांना ग्रामस्थांच्या मदतीने घराच्या पुढील बाजूस आणले. काही प्रमाणात जिवंत असलेले बिपीन हे रुग्णवाहीका येई पर्यंत अंगणातच मृत झाले.

 ग्रामस्थांनी प्रथमोपचार सुद्धा केले परंतु उपयोग झाला नाही. पोलीस पाटील नेवेश फर्नांडिस  यांनी मालवण पोलीस स्थानकात माहिती दिली. दोन्ही मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे शवविच्छेदन  करण्यासाठी नेण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिल्या. यावेळी मालवण पोलीस राजन पाटील, सुहास पांचाळ, कैलास ढोले, प्रमोद नाईक उपस्थित होते. देऊळवाडा आणि कावा ग्रामस्थांनी मदत कार्यात सहभाग घेतला. बिपीन यांच्या पश्चात मुलगा, आई असा परिवार आहे. एन गणेशोत्सवात पती पत्नीचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

error: Content is protected !!