मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतंर्गत जिल्ह्यात 9 लाख 22 हजार अर्जांना मंजुरी

महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यातील कपातीची रक्कम तातडीने परत करा

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना

कोल्हापूर (रोहन भिऊंगडे) : जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक 9 ऑगस्ट पर्यंत एकुण 9 लाख 22 हजार 770 अर्ज ऑनलाईन मंजूर करण्यात आले असून आजपर्यंत ऑनलाईन अर्जाचे 99.83 टक्के काम पूर्ण झाले आहे. तथापि ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक लाभार्थी महिलांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ‘मिनिमम बॅलेन्स’च्या नावाखाली तसेच इतर कारणांसाठी बँकांनी कपात करु नये अशा सूचना देवून सर्व बँकांनी कपातीची रक्कम तातडीने परत करावी, असे निर्देश पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्व बँक प्रतिनिधींना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी संपन्न झालेल्या बैठकीत पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांची ‘मिनिमम बॅलेन्स सह अन्य कारणांनी कपात केलेली रक्कम बँकांनी परत द्यावी. काही बँकांनी कपातीची रक्कम परत केली असून ज्या बँकांनी अद्याप ही रक्कम परत केलेली नाही त्या सर्व बँकांनी तातडीने कपातीची रक्कम परत करावी, अशा सूचना पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा अग्रणी बँकेचे गणेश गोडसे तसेच इतर सर्व बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना या महिन्यातही नोंदणी करता येणार असून येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पात्र महिलांनी नोंदणी करावी. या महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांचा अर्ज पात्र ठरला, तर त्यांना जुलै पासून तीन महिन्यांचा लाभ मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ज्या महिलांच्या बँक खात्याचे आधार सिडिंग झालेले नाही, ती प्रक्रियाही गतीने पूर्ण करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी सर्व बँक प्रतिनिधींना केल्या. जिल्ह्यातील आधार लिंक्ड नसलेल्या १.३८ लक्ष लाभार्थींचे आधार लिंक बँकांनी वेळेत पूर्ण केले. तसेच उर्वरित लाभार्थींची आधार जोडणी वेळेत करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे 9 लाख 22 हजार 770 अर्ज मंजूर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ॲपवरील 6 लाख 95 हजार 121 व पोर्टलवरील 2 लाख 27 हजार 649 अशा एकूण 9 लाख 22 हजार 770 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!