एस टी बस फेरीची देवली गावात पन्नास वर्षे पूर्ण
उद्या सकाळी गावात येणाऱ्या पहिल्या फेरीच्या एस. टी. च गावकरी करणार भव्य स्वागत
चौके (प्रतिनिधी) : सुमारे पन्नास वर्षांपूर्वी म्हणजेच 1974 पूर्वी चौके गावातून वरची देवली या गावात जाताना पायवाटने प्रवास करावा लागत असे. या मार्गावरून जाताना चौके मांडखोल वाडीवर एक पिंपळाचा पार लागतो तो अजूनही आहे. या झाडाच्या जवळ असलेल्या टेकडीवर केवळ दोन हात रुंदीची चढण चढून टेकडीच्या मध्यावर असलेल्या उंच वडाच्या झाडाजवळ आलो की समोर देवली गाव दिसत असे.
सन 1964 सुमारास महाराष्ट्रात दुष्काळ पडला त्यामुळे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेची कामे ठिकठिकाणी सुरू झाली दर दिवशी मजुरीवर काम करणे अशी परिस्थिती होती. यावेळी देवली ग्रामस्थांनी एकत्र येत चौके ते देवली रस्ता करण्याचा घाट घातला.. मात्र त्यावेळी शासनाच्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी देवली गावात रस्ता होऊ शकत नाही असा अभिप्राय दिला. शासनाच्या या निर्णयाने गावकरी रस्ता करायचाच या जिद्दीने पेटून उठले व रस्ता करण्याचा निर्धारच केला. मुंबईकर चाकरमानीही गावकऱ्यांच्या निर्णयाशी गावकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले.
आपला देवली रस्ता होणार यासाठी गावातील काही ग्रामस्थांनी आपल्या स्वमालकीच्या जमिनी स्वतःहून दिल्या तर काहीजण आपल्या जमिनी देण्यास नकार देत होते. त्यावेळी देवली नवागरवाडी येथील बाळकृष्ण गोविंद चव्हाण (रस्तेकार भाऊ) यांनी रस्त्यासाठी जिद्द बाळगली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे त्याकाळचे अनेक सहकारी त्यांच्याबरोबर उभे राहिले.. यात प्रामुख्याने (यशवंत शंकर चव्हाण (बाबुराव),वसंत चव्हाण, नारायण चव्हाण,आत्माराम चव्हाण,भगवान सखाराम चव्हाण,चंद्रकांत गोवेकर,शांताराम भाऊ, हरिश्चंद्र (चंदू)चव्हाण, येसादाजी चव्हाण, मनोहर चव्हाण, शिरी काका, दत्तू (भाई) चव्हाण, तुकाराम काका, लक्ष्मण आबा, कृष्णा तात्या तसेच मुंबईकर चाकरमानी यांचे मजबूत सहकार्य लाभले.
रस्ता झाला आणि गावात वीजही आली..
सुरुवातीला चौके ते देवली हा पाच किलोमीटरचा दगड मातीचा रस्ता टप्पा टप्प्याने तयार करण्यात आला.. रस्ता होताच ग्रामस्थांनी पुन्हा गावात वीज येण्यासाठी प्रयत्न सुरू केले महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर गावात वीज आली आणि गाव प्रकाशमान झाला.
एस टी बस चीही प्रतीक्षा संपली..
रस्ता तयार झाला वीज ही आली आता प्रतीक्षा होती ती दळणवळणाचे मुख्य साधन एस टी बस ची.. गावात बस येण्यासाठी एसटी प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.. मात्र प्रशासन तयार होत नव्हते अखेर एस टी बससाठी राजकीय पुढाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने एस टी बस सुरू करण्यासाठी प्रशासन तयार झाले.. पुन्हा नवीन अडचणी सुरू झाल्या गावात बस कुठे पर्यंत येणार.. बस मध्ये प्रवासी किती मिळतील..दिवसातून किती वेळा बस गावात येईल.. त्यात एसटी प्रशासनाकडून बसच्या प्रत्येक फेरीत किमान दहा तिकिटे विकली गेली पाहिजेत ही अट घालण्यात आली होती असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते.. बस चालू करायची हा निर्धार पक्का होता त्यात खर्चाचा प्रश्न उभा राहिल्यावर चाकरमानी मुंबईकर पुढे सरसावले त्याने दर महिन्याला वर्गणी गोळा करत हा प्रश्न मार्गी लावला पुढे सहा महिने ही व्यवस्था कायम चालल्यावर एसटी बस कायम सुरू झाली.
14 सप्टेंबर 1974 सालात सुरू झालेली मालवण चौके देवली एसटी बसला आज पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत..आज या रस्त्यांमुळेच गावात दळणवळणाची व्यवस्था झाली. लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू झाले. त्यावेळी येथील ग्रामस्थांनी मुंबईकर चाकरमानी यांनी गावाच्या विकासासाठी घेतलेली महत्त्वाची भूमिका आणि अथक प्रयत्न व रस्ता वीज आणि एसटी बससाठी केलेली पराकाष्टा हे विसरता नये आणि आज या दिवशी भूतकाळातील गोष्टींचे स्मरण करणे आवश्यक आहे.
दरम्यान 14 सप्टेंबर 2024 ला देवली गावातील स्थानिक ग्रामस्थ – चाकरमानी ग्रामस्थ करणार मालवण आगारातून येणाऱ्या पहिल्या फेरीसाठी देवली गावात येणाऱ्या एस टी बस चें भव्य स्वागत आणि वाहक चालकाचा सत्कार.. आणि पहिली एस टी चालू होण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यापैकी जे जेष्ठ ग्रामस्थ अजूनही आहेत त्याचाही सत्कार करणार आहेत.