कुडाळ (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर बिबवणे येथे स्कोडा कारची नॅनो कारला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात नॅनो कारमधील शिवसेना हुमरस शाखाप्रमुख एकनाथ उर्फ नाथा शांताराम परब (60 ) यांच्यासह गोपाळ उर्फ उमेश दत्ताराम सावंत (50 , रा. हुमरस) हे दोघे गंभीर जखमी झाले, तर नॅनो चालक सोनू चंद्रकांत लिंगवत ( रा. हूमरस ) जखमी झाले. दोन्ही कार कुडाळच्या दिशेने येत असताना ही घटना शनिवारी दुपारी 1.30 वाजता घडली.
जखमींना कुडाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नंतर अधिक उपचारासाठी बांबोळी – गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले. स्कोडा कार गोव्याहून कोल्हापूरच्या दिशेने जात होती, तर नॅनो कार हुमरस येथून कुडाळच्या दिशेने येत होती.या कारमधील नाथा परब , उमेश सावंत व सोनू लिंगवत कुडाळला शिवसेना कार्यालयात कार्यक्रमासाठी येत होते.
महामार्गावर बिबवणे व तेर्सेबांबर्डे सीमेलगत बिबवणे हद्दीत नॅनो कारला स्कोडा कारची धडक बसली.ही धडक एवढी जबरदस्त होती की नॅनो कार तीन वेळा पलटी होऊन दुभाजकाच्या पलीकडे जाऊन उलटली. आतील तिघे बाहेर फेकले गेले.जखमींना खासगी वाहनातून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हुमरस ग्रामस्थानी येथील रुग्णालयात धाव घेतली.सदरची माहिती मिळताच कुडाळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले .याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे हे करत आहेत.