तळेरे – कासार्डे उड्डाण पुलावर मोकाट गुरांचा वावर; वाहन चालकांसाठी ठरतेय डोकेदुखी

अपघात होण्याची दाट शक्यता

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे व कासार्डे या गावातून जाणाऱ्या उड्डाण पुलावर सध्या मोकाट गुरांचा मोठच्या मोठा कळप रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून उभा असतो यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून याबाबत योग्य उपाय योजना करून गुरांचा कायमचा बंदोबस्त करण्यात अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिक वृत्त असे की, मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावरील तळेरे व कासार्डे या दोन्ही गावातून उड्डाण पूल जात असून दोन्ही पुल जवळ जवळ एकमेकाशी सलंग्न असल्याने तसेच लागून नागरी वस्ती असल्याने येथील पाळीव जनावरे विशेष करून गुरे ही सदर पुलावर मध्यभागी बसलेली असतात कधी एकच गुर तर काहीवेळा गुरांचा मोठा कळप साधारणतः १५ ते २० गुरे एकत्र येऊन या महामर्गवरील उड्डाण पुलावर रस्ता अडवून मध्येच घोळक्याने उभी असतात.हॉर्न दिला तरी बाजूला होत नसल्यामुळे पर्यायी वाहन चालकाना वाहन थांबवून गुरांना बाजू करावे लागत आहे.यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी तर लागतात. परंतु भरधाव वेगाने असणारी वाहने गुरांचा अंदाज न आल्यास मोठा अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता देखील नाकारता येणार नाही.

सदर मार्गावर सकाळ,दुपार व रात्र या तिन्ही सत्रात ही गुरे आढळून येत असल्यामुळे या मोकाट जनावरांना कोणी मालक आहे की नाही ? असा प्रश्न वाहन चालकामधून व्यक्त केला जात आहे. तरी याबाबत स्थानिक ग्रामपंचायत तसेच मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुरांपासून वाहनचालकांना होणाऱ्या त्रासातून मुक्त करावे.तसेच अपघात घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी. अशी मागणी त्रस्त वाहनचालक महामार्ग प्रवासी नागरीकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!