72 लाख 81 हजार रुपये अपहार गुन्ह्यात ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे, आणि सिताराम जुवेकर चा अटकपूर्व जामीन फेटाळला

अटकेची टांगती तलवार

ओरोस (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायत मध्ये 72 लाख 81 हजार 76 रुपयांचा अपहार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी ग्रामविकास अधिकारी नामदेव रामचंद्र तांबे (रा.गरड, सावंतवाडी) आणि शांतादुर्गा एजन्सीचे मालक सिताराम चंद्रकांत जुवेकर (माणगाव) यांचा अटकपूर्व जामीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी युक्तिवाद केला. तळवडे ग्रामपंचायत मध्ये तत्कालीन ग्रामविकास अधिकारी नामदेव तांबे, विद्यमान सरपंच वनिता मेस्त्री, मक्तेदार धोंडू गजानन बांदिवडेकर, ठेकेदार प्रथमेश कमलाकर धुरी, शांतादुर्गा एजन्सी चे मालक सिताराम रामचंद्र जुवेकर यांनी संगनमताने तळवडे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधी मध्ये 72 लाख 81 हजार 76 रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद सावंतवाडी पंचायत समिती चे विस्तार अधिकारी गजानन धर्णे यांनी 14 ऑगस्ट 2024 रोजी दाखल केली होती. हा अपहार 17 नोव्हेंबर 2021 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याबाबत वरील सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी आरोपी नामदेव तांबे आणि सिताराम जुवेकर यांनी दाखल केलेल्या अर्जावर अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी हरकत घेतली. आरोपींकडे गुन्ह्याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे, या गुन्ह्यात अन्य कोणती बनावट कागदपत्रे बनवण्यात आली, त्यांचा वापर कसा झाला हे आरोपींना माहीत असण्याची शक्यता आहे, खोटी बिले तयार करून आरोपींनी सदर रक्कम स्वतः वापरली आहे त्यामुळे ती बिले हस्तगत करणे आवश्यक आहे, या गुन्ह्यातील रक्कम आरोपीच्या खात्यात जमा झाली असून त्या रक्कमेचा वापर कसा केला हा तपास करायचा आहे, आरोपीने असे अन्य गुन्हे केले असण्याची शक्यता असून त्या दृष्टीने तपास करायचा आहे आदी मुद्दे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हनुमंत गायकवाड यांनी दोन्ही आरोपींचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!