फोंडाघाट- मारुतीवाडीची गणपती विसर्जन मिरवणूक संस्कारक्षम- शिस्तबद्ध आणि लक्षणीय !

पंचक्रोशीत संयोजक मारुतीवाडी मित्र मंडळाचे कौतुक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अनंत चतुर्दशी दिवशी फोंडाघाट पंचक्रोशीतील घरोघरीच्या गणरायांचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. मात्र फोंडाघाट -मारुतीवाडी मधील दिमाखदार, शिस्तबद्ध पारंपारिक पद्धती च्या गणेश विसर्जनाची, सर्वत्र चर्चा असून पंचक्रोशीत- बाजारपेठेत सर्व वाडी वरील ग्रामस्थ, युवा संयोजकांचे कौतुक होत आहे .

आज सगळीकडे नितीनियम, परंपरा पायदळी तुडवून वाईट संस्कारांचे प्रदर्शन आणि गुलाल- फटाक्यांची अमर्याद आतषबाजी आणि कर्ण- कर्कश्य डीजे,लाऊड स्पीकर वरील बेधुंद गाणी आणि त्यावरील नाच याचा, सर्रास वापर होत असताना, मारुतीवाडी येथील नागरिक- युवा- युवतींचे नियोजन लक्षणीय आणि मार्गदर्शक ठरत आहे .

गावातील सर्व विसर्जनाच्या मिरवणुका पार पडल्यानंतर, आवश्यक लाईटच्या उजेडात अन् आकर्षक सजविलेल्या ट्रक- टेम्पो मधून मारुतीवाडी मधील मिरवणूक उशिरा सुरू झाली. सर्व युवा- युवती- ग्रामस्थ -अबाल वृद्धांचा एकच ड्रेस कोड आणि डोक्याला डौलदार फेटा बांधला होता.पारंपारिक हिंदू संस्कृती प्रमाणे ढोल ताशाच्या मंगलमय ललकारी आणि गणरायाच्या जयघोषात सर्वजण बेधुंद होऊन लयबद्धतेने नाचत होते. तर महिला युवतींनी झिम्मा- फुगडी- पारंपारिक हिंदूप्रथेचे दर्शन आपल्या नाच गाण्यातून दाखविले. शिस्तबद्ध तसेच कुठलाही धागडधिंगा, फटाके, गुलाल यांना फाटा देत मिरवणूक उशिरा उगवाई गणपती सान्यावर पोहोचली. आणि सामुदायिक आरती- प्रार्थना- गाऱ्हाणी होऊन तसेच प्रसाद वाटपाने विसर्जन सोहळ्याची शांततेत सांगता करण्यात आली. यावेळी वाहतूक खंडीत होणार नाही याची पोलीस कॉन्स्टेबल वंजारी व माने तसेच होमगार्ड यांनी काळजी घेतली.गणपती विसर्जनाच्या ग्रामपंचायतीने केलेल्या सोयींचे सर्वांनीच कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!