ओरोस (प्रतिनिधी) : कणकवली विधानसभेसाठी मागील आयोजित जनता दरबारातील बी एस एन एल वगळता बहुतांश प्रश्न निकाली निघाले आहेत. बी एस एन एल बाबत योग्य त्या उपाययोजना करून डिसेंबर महिन्या पर्यंत चांगल्या प्रकारचे नेटवर्क मिळण्यासाठी गती देण्याचे काम केले जाईल. तसेच आजच्या जनता दरबारात ९३ अर्ज आले आहेत. या अर्जांची पूर्तता पुढील १५ दिवसांत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघासाठी स्वतंत्र जनता दरबार आयोजित करून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. या जनता दरबारात आलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्याची कार्यवाही झाली की नाही याचा आढावा घेण्यासाठी पुन्हा २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत जनता दरबाराचे आयोजन केले आहे. बुधवारी कणकवली विधानसभेसाठी जनता दरबार संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री चव्हाण यांच्यासह या भागाचे आ नितेश राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उप वनरक्षक नवल किशोर रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आ अजित गोगटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.