कणकवली (प्रतिनिधी) : आयनल येथील श्रीदेवी पावणादेवीचा ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत वार्षिक नवरात्रोत्सव साजरा करण्यास पार्टी नं. १ चे सुर्यकांत साटम वगैरे पाच यांना कार्यकारी दंडाधिकारी दीक्षांत देशपांडे यांनी परवानगी दिली आहे. उत्सव साजरा करताना शांतता भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तर स्वतंत्र म्हणणे सादर केलेले पार्टी नं.१ चे प्रविण साटम व पार्टी नं. वे गजानन साटम बगैरे ६ यांनी उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. पार्टी नं. १ व्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
सदरचा उत्सव साजरा करण्याबाबत पार्टी नं. १ व २ यांच्यात एकमत झालेले नाही. त्यामुळे उत्सवावेळी शांतताभंग होऊन कायदा व सुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही पार्ट्यांना बंदी लावण्याचा अहवाल पोलिस प्रशासनाने सादर केला होता. तर पार्टी नं. १ ने जिल्हा न्यायालयाचा निकाल उल्लेखीत करून पार्टी नं.१ ला परवानगी द्यावी व पार्टी नं. २ ने उत्सवात सहभागी होण्यास हरकत नसल्याचे म्हणणे मांडले.
पार्टी नं. १ चे प्रविण साटम यांनी आपले स्वतंत्र म्हणणे सादर करून उच्च न्यायालयात प्रलंबीत अपिलाबाबत निर्णय झालेला नसल्याने दोन्ही पार्ट्यांना उत्सव साजरा करण्यास परवानगी देऊ नये असे म्हटले होते. तर पार्टी नं. २ ने आपणाला उत्सव साजरा करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केली होती. त्यावर सुनावणीअंती तसेच सत्र न्यायाधिश यांच्याकडील यापुर्वी निर्णीत झालेल्या पुर्नविलोकन अर्जातील अनुमानाकडे लक्ष वेधून उत्सवास बंदी घालण्याबाबत पुरेशी कारण दिसून येत नसल्याचा निष्कर्ष काढत सदरचे आदेश दिले आहेत.