ओरोस (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयाची सर्व जागा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्याने अस्तित्व धोक्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी तत्काळ भूखंड देण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले असताना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अद्याप सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणची बैठक बोलाविलेली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समिती व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने ११ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश पारकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालय हे स्थलांतरास विरोध म्हणून २६ सप्टेंबर २०२४ च्या जनता दरबारमध्ये जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समितीच्यावतीने निवेदन दिले होते. त्यावेळी पालकमंत्री यांनी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणात जिल्हा रुग्णालय सिंधुदुगसाठी स्वतंत्र भुखंड द्यावा यासाठी सोमवार ३० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन जिल्हा रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तीत्वात आल्यानंतर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गची सर्व शासकीय जागा ही वैद्यकीय महाविद्यालयास वर्ग करण्यात आली आहे. परिणामी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांना पर्यायी जागा मिळावी म्हणून २०२३ पासून सातत्याने भूखंडाची मागणी जिल्हा रुग्णालय प्रशासन नवनगर विकास प्राधिकरण, सिंधुदुर्गनगरी यांच्या जवळून करण्यात आली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणतीही कार्यवाही अथवा भूखंडाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी जागे अभावी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांना मंजूर झालेले बी.एस.सी. नर्सिंग (१०० विद्यार्थी क्षमता) महाविद्यालय नामंजूर होण्याची शक्यता आहे. तसेच जागेअभावी कॅथलॅब, महिला व बाल रुग्णालय, मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह अशी अनेक शासकीय योजनांमधून मंजूर झालेली सुविधा इतरत्र हलविण्यात आलेली आहेत.
यासर्व गोष्टींचा गांर्भियपूर्वक विचार करता नवनगर विकास प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी यांच्याजवळ मुबलक प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. परंतू प्रशासनाचा हलगर्जीपणा, कामचुकारपणा यामुळे सिंधुदुर्गनगरीच्या अपेक्षीत विकासाला खिळ बसत आहे. तरी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समितीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. या बैठकीत ३ किंवा ४ ऑक्टोबर ला स्वतंत्र प्राधिकरणची बैठक घेण्याचे मान्य केले होते. मात्र आज पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हा प्रश्न आचारसहितापूर्वी मार्गी लागणे अपेक्षीत होते. पंरतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने बचाव समितीने ३० सप्टेंबर २०२४ रोजी दिलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या इशाऱ्याप्रमाणे ११ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा रुग्णालयास भूखंड मिळण्यासाठी धरणे आंदोलनाला बसणार आहोत, असे अध्यक्ष पारकर यांनी सांगितले. यावेळी रामचंद्र घोगळे, हार्दिक शिगले, विलास हडकर, सुनील जाधव, शुभम परब आदी उपस्थित होते.