शालेय मैदानी स्पर्धेत ओझर विद्यामंदिरचे यश !

मसुरे (प्रतिनिधी) : त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे हायस्कूलच्या मैदानावर नुकत्याच पार पडलेल्या मालवण तालुकास्तरीय शासकीय शालेय मैदानी स्पर्धेमध्ये ओझर विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे. अमृता गणेश बागवे हिची १४ वर्षे मुलींच्या वयोगटामध्ये १०० मीटर धावणे,उंच उडी व लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. ईशा गणेश सुर्वे हिने १७ वर्षे मुलींच्या वयोगटामध्ये थाळीफेक क्रीडा प्रकारामध्ये तालुकास्तरीय प्रथम क्रमांक पटकावून तिची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. मुलग्यांच्या १७ वर्षे वयोगटामध्ये शुभम बाबाजी हडकर याने गोळा फेक स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक व थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक पटकावून आपला जिल्हास्तरावरील स्पर्धेसाठी प्रवेश निश्चित केला आहे.१४ वर्षे मुलींच्या गटामध्ये लाजरी कांदळगावकर, अस्मी पारकर,अमृता बागवे,माहीन शेख या मुलींच्या गटाने रिले क्रीडा प्रकारामध्ये तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

ओझर विद्यामंदिरचे क्रीडा शिक्षक प्रवीण र.पारकर यांनी मुलांकडून कसून सराव करून घेतल्याने हे यश मुलांनी संपादन केले. खेळाचे योग्य मार्गदर्शन आणि सरावादरम्यान क्रीडा शिक्षकांनी करून घेतलेली मेहनत, यामुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो,असे मुलांनी सांगितले. मुलांनी मिळविलेल्या यशाबद्दल मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समितीचे अध्यक्ष शेखर अर्जुन राणे,सचिव जी. एस.परब, खजिनदार शरद परब,सर्व संस्था चालक, शालेय समितीचे अध्यक्ष किशोर नरे व सर्व सदस्य तसेच ओझर विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षक प्रवीण पारकर यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!