निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करा

महाविकास आघाडी चे वैभववाडी तहसीलदार कार्यालय समोर उपोषण

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी उंबर्डे, खारेपाटण भुईबावडा व घाटात निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात यावी. यासाठी महाविकास आघाडीकडून गुरुवारी तहसीलदार कार्यालय वैभववाडी समोर उपोषण सुरु करण्यात आले होते. उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, शिवसेना नेते अतुल रावराणे, सतीश सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,काँग्रेस तालुका अध्यक्ष दादामिया पाटणकर,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण,लक्ष्मण रावराणे, रजब रामदूल, सुनील कांबळे,नलिनी पाटील, अनिल कदम यांच्यासह उबाठा सेनेचे व मित्र पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. करूळ आणि भुईबावडा दोन्ही घाट बंद असल्याने या भागाचा पश्चिम महाराष्ट्राची संपर्क तुटला आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल करीत भुईबावडा घाटात संरक्षक भिंतीची बोगस कामे सुरू असून या कामांमध्ये राजरसपणे दगड टाकले जात आहेत. आपल्या कार्यालयाकडे व्हिडिओ पाठवूनही आपण कारवाई का करत नाही. असा प्रश्न उपस्थित केला. कार्यकारी अभियंता सर्वगोड यांच्यामुळे बांधकाम खाते बदनाम झाले आहे. बोगस ठेकेदारांना पाठीशी घालण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केले आहे.

तर सतीश सावंत म्हणाले बोगस कामे करून जनतेच्या पैशाची राजरोसपणे लूट सुरू आहे. एवढे होऊनही येथील व्यापारी जनता गप्प का? या सर्व प्रकाराला येथे स्थानिक आमदार नितेश राणे हे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या ठेकेदारांकडून आमदार टक्केवारी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

अतुल रावराणे म्हणाले की स्थानिक आमदार हे ठेकेदारांचे भागधारक आहेत. येथील क्रेशर मध्ये त्यांची हिस्सेदारी आहे केवळ ठेकेदारांना समृद्ध व निकृष्ट कामाला पाठिंबा अशी त्यांची भूमिका आहे. आमदार राणे सर्वत्र जातीय वाद पसरवण्याचे काम करीत आहे अशा आमदारांना या भागातून हद्दपार केले तरच आपल्या भागाचा विकास होईल असे रावराणे यावेळी म्हणाले.

अखेर वैभववाडी ते उंबर्डे व खारेपाटण ते भुईबावडा दरम्यान खराब झालेला रस्ता संबंधित ठेकेदाराकडून पावसाळा झाल्यानंतर पुन्हा करून घेण्यात येईल. त्याचप्रमाणे संबंधित ठेकेदारांना सदरचे काम सुस्थितीत करीपर्यंत नवीन निविदा प्रक्रियेत भाग घेण्यास प्रतिबंध करण्याची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात आली आहे.भुईबावडा घाटातील वाहतूक 14 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येईल. असे लेखी पत्र उपविभागीय अधिकारी विनायक जोशी यांनी उपोषण करताना दिले आहे. या लेखी आश्वासन नंतर शिवसेना महाविकास आघाडीचे सुरू असलेले उपोषण दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास मागे घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!