दिविजा वृद्धाश्रम असलदे यांच्यामार्फत सुगंधी उटणे वाटप
खारेपाटण (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमातील वृद्ध आजी आजोबांकडून येणाऱ्या दिवाळी निमित्त खारेपाटण हायस्कूलच्या मुलांना दिवाळीनिमित्त त्यांनी स्वतः बनवलेल्या सुगंधी उटण्याचे वाटप नुकतेच संस्थेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ न.म.विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणचे विद्यार्थी सदर वृद्धाश्रमाला वेळोवेळी भेट देत असतात. त्यामुळे या आश्रमातील आजी आजोबांचा प्रशालेतील विद्यार्थ्यांशी स्नेह निर्माण झाला आहे. या स्नेहाच्या भावनेतून या वृद्धाश्रमातील आजी आजोबांनी स्वतः तयार केलेले सुगंधी उठणे खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी भेट स्वरूपात दिले. या भेटीच्या माध्यमातून विद्यार्थी व वृद्धाश्रमातील आजी – आजोबा यांच्यामध्ये प्रेमाचे, स्नेहाचे व जिव्हाळ्याचे संबंध वृद्धिंगत झाले आहेत. नुकतेच शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ रोजी दिविजा वृद्धाश्रमातील कार्यरत असणाऱ्या सायली तांबे व अश्विनी पटकारे यांनी प्रशालेत स्वतः येऊन या सुगंधी उटण्याचे वाटप विद्यार्थ्यांना केले. वृद्धाश्रमातील एक आजोबा देखील यावेळी उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत शाळेच्या वतीने प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी केले तर शाळेचे पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी दिविजा वृद्धाश्रमाचे आभार मानले.