जुगार अड्ड्यावर छापा ! 58 जुगारी पोलिसांच्या ताब्यात

1 लाख 20 हजारांच्या रोकडीसह 6 लाख 78 हजारांचा मुद्देमाल जप्त

काेल्हापुर (रोहन भिऊंगडे ) : चंदगड तालुक्यातील शिनोळी इथल्या जुगार अड्ड्यावर कोल्हापुरातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी धडक कारवाई केलीय. सायंकाळच्या सुमारास अड्ड्यावर मारलेल्या छाप्यात रोकड, मोबाईल आणि जुगाराचं साहित्य असा सुमारे सहा लाख अष्ट्यात्तर हजार वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अठ्ठावन जणांना ताब्यात घेवून त्यांच्यावर चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षक महिंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील बेकायदेशीर व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगानं कारवाई करताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चंदगड तालुक्यातील शिनोळी इथल्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जुगार अड्डा मालक रतन पचेरवाल, इमारत मालक सर्फराज ताशिलदार यांच्यासह जुगार अड्डयावरील 5 कर्मचारी आणि जुगार खेळणारे 51 अशा एकूण 58 जणांना ताब्यात घेतल. पोलिसांनी या ठिकाणाहून एक लाख वीस हजार रुपयांची रोकड 58 मोबाईल संच आणि जुगाराचे साहित्य असा एकूण सहा लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन मसुगटे, अंमलदार दीपक घोरपडे, राम कोळी, समीर कांबळे, राजू कांबळे, सतीश जंगम, वसंत पिंगळे, महेश आंबी, सागर चौगले यांनी मिळून केली.चंदगड पोलीस मात्र अनभिज्ञ …महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील शिनोळी इथला हा अड्डा अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. तालुक्यात मटका, जुगार, गोवा बनावटीच्या दारूची विक्री राजरोसपणे सुरु असल्याच्या चर्चा होत आहे. शिनोळी इथल्या जुगार अड्ड्यावर सीमाभागातील अनेक लोक खेळायला येतात. कोल्हापुरातील पोलिसांना याची माहिती मिळते, ते छापा टाकतात. मात्र, स्थानिक चंदगड ठाण्याच्या पोलिसांना याबाबत काहीही माहिती नसतं याचा अर्थ काय काढायचा? असा संतप्त सवाल जनतेमधून विचारला जात आहे. यावर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय निर्णय घेणार याकडं जनतेचं आत्ता लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!