दत्तकुमार फोंडेकर यांना भोईर समाज प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर

१९ मार्च रोजी विरार येथे होणार पुरस्कार वितरण

कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट गावाचे सुपुत्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरवडे कोनापाल, सावंतवाडी शाळेचे मुख्याध्यापक,मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी तसेच संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्ष दत्तकुमार दिगंबर फोंडेकर यांची भोईर सामाजिक प्रतिष्ठान पालघर या प्रतिष्ठानने राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२३ साठी निवड केली आहे. दत्तकुमार फोंडेकर यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा, निबंध, वक्तृत्व, प्रश्नमंजुषा, पर्यावरणाची जाणीव जागृती, स्वावलंबन आदी उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्राबरोबरच फोंडेकर सर यांची सामाजिक क्षेत्रामध्ये देखील उल्लेखनीय कामगिरी आहे. कोविड कालावधी मधील रक्तदान शिबिर, अन्नधान्य वाटप, जातीभेद निर्मूलनसाठी साठी प्रशासकीय पातळीवर निवेदन सादर करून आवाज उठविणे, खेड्यातील वंचित, गोरगरीब जनतेला समाजाच्या वाहत्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रबोधन करणे तसेच आपल्या शांत स्वभावाने अनेक पदाधिकारी, लोक यांचे मन जुळविन्यामध्ये त्यांचा हातखंड असून याच त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील विशेष कार्याची दखल घेऊन भोईर सामाजिक प्रतिष्ठान मार्फत त्यांची आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२३ साठी निवड केली आहे. असे प्रतिष्ठान मार्फत दिलेल्या निवडपत्रात म्हटले आहे.

हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दिनांक १९ मार्च रोजी विरार जिल्हा पालघर येथे मान्यवरांच्या तसेच साहित्यिकांच्या प्रमुख उपस्थितीत देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्यातील निवडक शिक्षकांमध्ये या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी, सेवाभावी प्रतिष्ठान मुंबई, फोंडाघाट ग्रामस्थ, सावंतवाडी तालुक्यातील शिक्षकवर्ग, विद्यार्थी वर्ग यांच्याकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!