वैभववाडी (प्रतिनिधी) : तीन चार दिवसाच्या विश्रांतीनंतर वैभववाडी तालुक्यात गुरुवारी विजांच्या कडकटासह जोरदार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे भात कापणी करत असलेल्या शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.यावर्षी परतीचा पाऊस अजूनही जायचे नाव घेत नाही. या परतीच्या पावसाचा फटका भात शेतीसह नाचणी पिकालाही बसत आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी सायंकाळी काहीठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. तर गुरुवारी दुपारनंतर जोरदार विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने झोडपून काढले. या अवकाळी पावसाने भात शेती बरोबरच नाचणी व ऊस शेतीवरही याचा मोठा परिणाम झाला आहे. या पावसाने भात शेती कापणीत विलंब होत असून भात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.तर भात शेती भिजत असल्यामुळे गुरांच्या वैराणीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या पावसाने नाचणी पीक कापणीला विलंब होत असल्यामुळे जंगली प्राण्याकडून भात शेती बरोबरच नाचणी शेतीचे नुकसान केले जात आहे. एकीकडे परतीचा पाऊस तर दुसरीकडे रान डुक्कर, गवा रेडा सारख्या जंगली प्राण्याकडून उभ्या पिकाची नासधूस होत आहे. हातातोंडाशी आलेला घास पाऊस व जंगली प्राण्याच्या उपद्रवामुळे हिरावून घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
परतीच्या पावसामुळे ऊस तोडनीलाही विलंब होण्याची शक्यता आहे. लवकरच गळीत हंगाम सुरु होणार असून या पावसामुळे तोडणीला विलंब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ऊस शेतीचे संपूर्ण गणित कोलमडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.