राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांचा विश्वास
कुडाळ (प्रतिनिधी) : गेल्या दहा वर्षात कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास केला गेला नाही आता व्हिजन असलेले महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या रूपाने मतदारसंघातील जनतेला नव्या आशेचा किरण दिसायला लागला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे यापूर्वीची सगळी रेकॉर्ड तोडून निवडून येतील असे अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ, सावंतवाडी मतदार संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी महायुतीच्या कुडाळ येथील प्रचार कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
महायुतीमधील अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, माजी नगराध्यक्ष विनायक राणे, बाळा पावसकर आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष काका कुडाळकर यांनी सांगितले की, खासदार नारायण राणे व महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना टार्गेट करून प्रचार केला जात आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे अशा प्रकारची टीका केली जात आहे. महायुतीचे उमेदवार निलेश राणे हे या मतदार संघाच्या विकासाच्या व्हिजन संदर्भात किती सकारात्मक आहेत, हे जनतेला समजत आहे. गेल्या दहा वर्षात या भागाचा रखडलेला विकास निलेश राणे करू शकतात हा विश्वास लोकांना बसला आहे. निलेश राणेंचा हा विजय ऐतिहासिक असेल सर्व रेकॉर्ड तोडून ते निवडून येतील असे त्यांनी सांगून महायुतीचे उमेदवार हे निलेश राणे असले पाहिजे असे मत सर्व पक्षातून आल्यानंतर विरोधकांना पोटसूळ उठलं. ९० सालापासून या जिल्ह्याच्या विकासाला खासदार नारायण राणे यांनी चालना दिली त्यानंतर निलेश राणे हे खासदार झाल्यावर त्यांनी विकासाला हातभार लावला. पर्यटनाच्या माध्यमातून आर्थिक प्रगती झाली आणि हा विकास विरोधकांकडून पुढे होऊ शकला नाही. त्यामुळे आता त्यांना पराभवाची भीती वाटू लागली आहे. खासदार नारायण राणे यांनी महिला रुग्णालय, क्रीडांगण अशा शाश्वत विकासाला चालना दिली असे सांगून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी विरोधक वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहेत. मुळात पिण्याच्या पाण्याची पायाभरणी ही खासदार नारायण राणे यांनी त्या काळात केली तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी सिंधूरत्न योजना आणून या ठिकाणच्या तरुणांना रोजगार निर्मिती करून दिली. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांचा विजय पक्का असून विरोधकांच्या टिकांना २३ नोव्हेंबरच्या विजयाने उत्तर देऊ असे त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.