ग्लोबल असोसिएटसने पालकमंत्री चव्हाण यांचे वेधले लक्ष
कणकवली (प्रतिनिधी): कणकवलीतील गोरगरीब भाजी विक्रेते व फळ विक्रेते तसेच नागरिकांची गैरसोय आता स्टॉल हटाव मोहिमेमुळे झाली आहे.कणकवली नगरपंचायत आरक्षण क्र. २६ मधील सुसज्य असे भाजी मार्केट आम्ही बांधून तयार केले आहे. त्यामुळे ते कणकवली नगरपंचायतीने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, असे पत्र पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे ग्लोबल असोशिएटच्या वतीने प्रथमेश राजन तेली यांनी दिले आहे.
कणकवलीत भाजीवाल्यांची व फळवाल्यांची गैरसोय होत आहे, ते गरीब लोक आहेत. त्यांचे हातावरचे पोट आहे, त्यामुळे त्यांचा धंदा बंद होऊन पोटावर पाय येऊ नये. त्यांचा व्यायसाय सुरळीत चालू राहावा त्याच बरोबर कणकवली शहर हे स्वच्छ व सुंदर राहिले पाहिजे, नागरिकांची गैरसोय होता नये, असे सर्व गोष्टी लक्षात घेऊन आज कणकवलीच्या मध्यवर्ती सुसज्य भाजी मार्केट पूर्ण होऊन तयार आहे. त्यामुळे भाजी मार्केटची इमारत कणकवली नगरपंचायतीने ताब्यात घ्यावे.
तब्बल पाच कोटी किंमत असलेली भाजी मार्केट हि इमारत ग्लोबल असोशिएटस भागीदार प्रथमेश राजन तेली व जागा मालक हे नगरपंचायतला विनामोबदला देत आहेत. तरीही मुख्याधिकारी कणकवली नगरपंचायत यांना आपण आदेश द्यावा, कोणतीही दिरंगाई न करता भाजी मार्केट ताब्यात घेऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी. तसेच गोर गरीब भाजीवाल्यांना व फळवाल्याना देखील न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ग्लोबल असोशिएट्स तर्फे भागीदार प्रथमेश राजन तेली यांनी केली आहे.