ज्यांचे या जगात कोणी नाही ते जीवन आनंद संस्थेचे

आठ दिवसांत गोव्यातील एक निराधार वयोवृध्द भगीणी व दिव्यांग बांधवास संविता आश्रमाचा आसरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : आपले सैनिक बांधव थंडी असो उन असो वादळ असो सिमेवर रात्रंदिन खडा पहारा देवून देश वासियांचे रक्षण करतात. तद्वतच जीवन आनंद संस्थेचे कार्यकर्ते सैनिक सदैव जागृत राहून समाजातील रस्त्यावरील निराधार, वयोवृध्द, मनोरूग्ण, दिव्यांग, वंचित असलेल्या बांधवांना संस्थेच्या आश्रम आणि शेल्टर होम द्वारे माणूसकीचे जीवन मिळवून देण्यासाठी सदैव कार्यरत असतात. जीवन आनंद संस्थेचे ब्रीदवाक्यच आहे- ‘ज्यांचे या जगात कोणी नाही,ते जीवन आनंद संस्थेचे आहेत.’ त्याचप्रमाणे जीवन आनंद संस्थेचे संस्थापक सचिव संदिप परब व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांत गोव्यातील रस्त्यावर निराधार वंचिततेते जीवन जगत असलेल्या दोन व्यक्तींना संविता आश्रम पणदूर येथे दाखल करण्यात आले.

दि.९ मार्च च्या रात्री संदिप परब हे म्हापसा टॅक्सी स्टँड परिसरात नेहमीप्रमाणे रस्त्यावरील निराधार बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी फुटपाथ  झोपले होते. यावेळी म्हापसा पोलिसांच्या माध्यमातून मजना बी या ६५ वर्षीय निराधार महिलेस  संस्थेच्या सविता आश्रम मध्ये सुरक्षिततेसाठी ताब्यात देण्यात आले. यावेळी संदिप यांचेसह प्रसाद आंगणे, साईदास कांबळे, जान्हवी मिठबावकर या कार्यकर्त्यांनी मजना बी यांना आश्रमात सहाय्य करण्यात भूमिका निभावली.

दुस-या प्रकरणात दि. १६ मार्च,२३ रोजी थिवीम रेल्वे स्टेशन च्या जवळ असलेल्या रस्त्यावर एक अपंग असल्याचे समजले. रस्त्याच्या बाजूला कच-यात असलेल्या या माणसाला गुडघ्याच्या वरती उजवा पाय नसल्याचे दिसून आले. अब्दुला वय अंदाजे ५० हा  निराधार बांधव केरळ, हिंदी व थोड्या थोड्या मराठी भाषेत संवाद साधतो. कोलवाळ पोलिसांच्या मदतीने आब्दुल्लास जीवन आनंद संस्था संचलित संवीता आश्रम पणदुर येथे मध्यरात्री २:१० ला दाखल केले.

ह्यावेळी संदिप परब, प्रसाद आंगणे, नरेश आंगणे, साईदास कांबळे, अक्षय मेस्त्री, सचिन सावंत उपस्थित होते. जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांनी संस्थेच्या वाटचालीत भुमिका निभावणारे कार्यकर्ते, देणगीदार, संस्थेचे हितचिंतक, संवेदनशील अधिकारी वर्ग व पत्रकार बांधव यांसह सर्व सबंधीतांचे योगदान आणि सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!