आचरा (प्रतिनिधी) : मुंबई विद्यापीठाच्या DLLE विभागामार्फत आयोजित ‘उडाण’ या उपक्रमांतर्गत ‘पोवाडा’ या सादरीकरण स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आचरा कॉलेज ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, आचरा यांनी प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सदर स्पर्धा दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथे पार पडली. या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून परीक्षकांची मने जिंकली.
या यशामागे विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणा देणाऱ्या प्रा. मुणगेकर मॅडम यांचे मोलाचे योगदान लाभले. तसेच या पोवाड्याच्या बसवणीसाठी न्यू इंग्लिश स्कूलचे क्लार्क अनिरुद्ध आचरेकर व श्री.पाटकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले असून त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या स्पर्धेतील यशामुळे महाविद्यालयाची पुढील फेरीसाठी निवड झाली असून ती दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी University of Mumbai येथे होणार आहे. पुढील स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
या यशाबद्दल प्राचार्य नितेश सारंग यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. तसेच संस्था अध्यक्ष संजय मिराशी यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.












