नवीन कुर्ली वसाहत समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
वैभववाडी (प्रतिनिधी) : प्रकल्पग्रस्त पुनर्वसन फोंडा लोरे याठिकाणी भूखंड पाडून 1995 साली भूखंडाचे प्रत्यक्ष वाटप करावयास सुरवात झाली. त्यामुळे महाराष्ट्र प्रकल्पबाधीत व्यक्तीचे पुनर्वसन अधिनियम 1999 मधील तरतुदीप्रमाणे पुनर्वसित नविन कुर्ली नागरी सुविधांपासून वंचीत आहे. पुनर्वसित गावठाणात नविन कुर्ली असे नामकरण देऊन जिल्हाधिकारी यांनी दिनांक 25/02/2002 रोजी आदेश काढून महसुली गांव म्हणून घोषीत केला आणि सन 2003 मध्ये प्रकल्पाची घळभरणी करुन प्रकल्पामध्ये पाणी साठा करणेत आला. त्यामुळे नागरीकांना मुळ कुर्ली गावातून स्थलांतरीत व्हावे लागले. परंतू नविन गावठाणाचे हस्तांतरण जिल्हा परिषदेकडे अदयापी झालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या हक्कासाठी नवीन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत देण्यात यावी, अशी मागणी नवीन कुर्ली वसाहत समिती अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी आर डी सी अविनाशकुमार सोनवणे यांच्याकडे केली आहे. यावेळी सेनापती सावंत, उत्तम तेली, देवेंद्र पिळणकर आदी उपस्थित होते.
नविन कुर्ली हे पुनर्वसित गावठाण महसुली गांव म्हणून घोषीत झाल्यावर स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापण करणेबाबतच्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत स्थापन करण्याबाबत प्रशासकीय पातळीवरुन त्वरीत कार्यवाही होणे अपेक्षीत होते. परंतू स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वतंत्र ग्रामपंचायतीचा प्रस्ताव तयार करुन ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद यांचेकडे सादर करुन 20 वर्षे झाली तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नागरीकांना मूलभूत हक्कापासून वंचीत रहावे लागत आहे. याचा विचार करून नविन कुर्ली वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची कार्यवाही त्वरीत करणेत यावी. अन्यथा 1 मे 2023 या कामगार दिनादिवशी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदूर्ग या ठिकाणी प्रकल्पन ग्रस्थांसह अपोषण करण्यात येईल, असा इशाराही अनंत पिळणकर यांनी यावेळी दिला.