5 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद मैदानावर होणार शपथविधी
मुंबई (प्रतिनिधीं) : राज्याच्या मुख्यमंत्रीपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव अखेर फायनल झाले आहे. मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार या महायुतीच्या नेत्यांनी त्यासाठी पसंती दर्शवली आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आझाद मैदानावर सायंकाळी ५.३० वाजता हा शपथविधी होणार आहे. याबाबतची माहिती खुद्द भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महायुतीच्या नेत्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले, उद्या होणाऱ्या महायुतीच्या शपथविधीसाठी सर्व नेत्यांनी आपली पसंती दर्शवली आहे. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. किती जण शपथ घेणार? याबाबत सायंकाळी उशिरा माहिती देण्यात येईल. तूर्तास राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलेला आहे. उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.