अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : विनयभंग आणि पोक्सो च्या गुन्ह्यात आरोपी रुपेश गोपाळ ढवण ( रा. नागवे, ता. कणकवली ) याला 3 वर्षे सक्त मजुरीसह 15 हजार रुपये दंडाची शिक्षा प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री. एच.बी.गायकवाड यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी यशस्वी युक्तिवाद केला. तुळशी विवाहासाठी तेरा वर्षाची पीडित मुलगी आपल्या आजोबांसोबत रात्री साडेआठच्या दरम्यान वाडी मध्ये जात असताना आरोपी रुपेश गोपाळ ढवण याने मागून येऊन पीडितेच्या खांद्यावर हात ठेवून त्यानंतर पीडीतेचा विनयभंग केला. ही घटना 9 नोव्हेंबर 2019 रोजी घडली होती. त्याबाबतचा गुन्हा कणकवली पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला होता. त्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रूपाली गोरड यांनी केला होता. सदरचा खटला प्रमुख जिल्हा न्यायाधीश एच बी गायकवाड यांच्या न्यायालयात चालला. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी महत्त्वाचे साक्षीदार तपासून युक्तिवाद केला होता. आज न्यायालयाने आरोपीला भादवि कलम 354 व पोक्सो कायदा कलम 8 प्रमाणे दोषी धरून तीन वर्ष सश्रम करावास व पंधरा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे एकाच आठवड्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता तोडकरी यांनी दोन वेगवेगळ्या खटल्यात आरोपींचा गुन्हा सिद्ध केला असून दोन्ही खटल्यांत आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी वृद्धिंगत होण्यासाठी सकारात्मकता वाढेल.