देवाच्या सेवेबरोबर देशाची सेवा करणे महत्त्वाचे-गणेश जेठे
श्री स्वामी समर्थ मठ हडपीड येथे आयोजित नेत्र तपासणी रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद
देवगड (प्रतिनिधी) : जगातलं सर्वात मोठं दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे. म्हणूनच रक्तदान हे श्रेष्ठदान असे म्हटले जाते. शिबिरात ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले ती फार मोठी स्वामींची ईश्वरी सेवा असल्याचे प्रतिपादन देवगड तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष अयोध्याप्रसाद गावकर यांनी हडपीड येथे व्यक्त केले.
श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ- हडपीड, देवगड तालुका पत्रकार समिती, नॅब नेत्र रुग्णालय देवगड, हडपीड गाव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हडपिड येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे आयोजित भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी श्री. गावकर बोलत होते. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे, शिरगाव हायस्कूलचे चेअरमन विजयकुमार कदम, शिरगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन मंगेश लोके, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे प्रसाद दुखंडे, जिल्हा प्रतिनिधी महेश शिरोडकर, डॉ. पल्लवी सरवडे, श्री स्वामी समर्थ मठाचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर राणे, संस्थापक सचिव नंदकुमार पेडणेकर, खजिनदार ज्ञानेश्वर राऊत, डॉ. हक्के आदी उपस्थित होते.
गावकर पुढे म्हणाले की, स्वामी समर्थांचा मठ सिंधुदुर्गात व्हावा ही सर्व स्वामीभक्तांची इच्छा होती. त्यानुसार स्वामीभक्त पेडणेकर त्यांनी आपल्या सर्व स्वामी भक्तांना सोबत घेऊन सुंदर अशा श्री स्वामी समर्थ मठाच्या निर्मितीच्या कामास २०१३ पासून सुरूवात केली. २०१९ साली हा मठ उदयास आला. त्यानंतर हडपीड गावाला भक्तीमय स्वरूप आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हडपीड येथील श्री स्वामी समर्थांचा मठ प्रसिद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार गणेश जेठे म्हणाले
आपला देवगडचा प्रवास होत असला तरी इथे येण्याची संधी आज मिळाली. इथलं वैभव बघून खूप छान वाटलं. आपल्या जिल्ह्यात अक्कलकोट स्वामींचा मोठा मठ आहे, याचा आनंद होतोय. या मंडळाने रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनातून देवाच्या सेवेबरोबर देशाची सेवा ही महत्त्वाची आहे. याचे कारण मुलाच्या जन्मापासून त्यांच्या शिक्षणाची, कुटुंबाची जबाबदारी सरकारप्रती देशाचीच आहे. म्हणून देवाच्या सेवेबरोबर रक्तदान आणि नेञतपासणी शिबिराचे आयोजन करून देशभक्ती प्रति असलेली सामाजिक जाणीव या मंडळाने दाखविली असल्याचे गौरवद्गारही त्यांनी काढले.
शिरगाव हायस्कूलचे चेअरमन विजयकुमार कदम म्हणाले, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार मंडळींचा या उपक्रमात असलेला सहभाग महत्वाचा आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य प्रसाद दुखंडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठानचे सदस्य यांनी देखील या शिबिरास भेट दिली. शिबिरादरम्यान उपस्थित मान्यवरांचा मठाच्यावतीने सत्कार करण्यात आला. रक्तदात्यांना मठाच्यावतीनेही प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या सर्व रक्तदात्यांचे श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड, देवगड तालुका पत्रकार समिती व नॅब नेत्र रुग्णालय, हडपीड गाव समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.