कणकवली (प्रतिनिधी) : संत रोहिदास सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांना भागीरथी भोईर सामाजिक प्रतिष्ठान पालघर चा राज्यस्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थाध्यक्ष दिनेश भोईर यांच्या हस्ते संजय कदम यांना सन 2023 सालचा अत्यंत प्रतिष्ठेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार विरार येथील भाऊसाहेब वर्तक हॉल मध्ये 19 मार्च रोजी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी संस्था सचिव अंकुश भोईर उपस्थित होते. संजय कदम यांनी संघटनेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची याआधीही विविध संस्थांनी दखल घेत त्यांना अनेक पुरस्कारानी सन्मानीत केले आहे. माजी उपमुख्यमंत्री तथा विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते संजय कदम यांना गतवर्षी संत रोहिदास संघटना पुणे यांचा राज्यस्तरीय रोहिदास रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

तसेच श्रावस्थी बहुऊदेशिय सेवा संस्था भारत या राष्ट्रीय संस्थेचा राज्यस्तरीय रोहिदास समाज प्रेरणा पुरस्कारही संजय कदम यांना प्राप्त झाला आहे. संत रोहिदास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष संजय कदम यांनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर सामाजिक प्रश्न उचलून धरले आहेत. थेट राष्ट्रपतींपर्यंत समाजातील दुर्बल अन्यायग्रस्त घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. कदम यांना मिळालेल्या राज्यस्तरीय डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












