सम्यकवक्ता : २०२४ उत्साहात संपन्न
सम्यक साहित्य संसद, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आणि दर्पण प्रबोधिनी, सिंधुदुर्ग यांचे संयुक्त आयोजन
कणकवली (प्रतिनिधी) : विद्रोही कवी तथा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता उत्तम पवार यांनी आपल्या शालेय, महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थी चळवळीत स्वतः झोकून देत छात्रभारती आणि आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्त्यांना आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आणि विद्रोही लेखनीने सामाजिक, सांस्कृतिक भान दिले. परंतु त्यांच्या अकाली निधनाने आंबेडकरी चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली. आजच्या वर्तमान परिस्थितीत त्यांच्या कृतीशील कार्याची युवा पिढीला सतत प्रेरणा मिळावी या उद्देशाने येथील सम्यक साहित्य संसद, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी आणि दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान आणि प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त कवी उत्तम पवार स्मृती राज्यस्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा सम्यकवक्ता-२०२४ चे आयोजन मराठा नाट्यगृह येथे करण्यात आले होते. संपूर्ण राज्यभरातून १८ ते ३५ वयोगटातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
यावेळी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात कार्यकरी अभियंता अजयकुमार सर्वगोड उद्घाटक म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सम्यक साहित्य संसदेचे इंजि.अनिल जाधव, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय सरचिटणीस सुनिल हेतकर, अपरान्तचे जिल्हाध्यक्ष प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे, प्राचार्य सिद्धार्थ तांबे, आणि संयोजन समितीचे निमंत्रक राजेश कदम उपस्थित होते.
अजयकुमार सर्वगोड आपल्या उद्घाटकीय भाषणात म्हणाले की,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय संविधानात्मक लोकशाहीधिष्टित अधिकार प्राप्त करून दिलेत. व्यक्तीची प्रतिष्ठा आणि दर्जाची व संधीची समानता, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुतेची शिकवण दिली. म्हणून हे भारतीय संविधान संवर्धित आणि सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.केवळ रस्त्यावरचा लढा देवून प्रश्न सुटणार नाहीत तर शासनकर्ती जमात बनण्याचा प्रयत्न करावा लागेल. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांचा क्रांतीशील लढा नव्या पिढीला समजून देण्याची गरज आहे. असे प्रतिपादन श्री. सर्वगोड यांनी उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी सम्यक साहित्य संसद अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि.अनिल जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, उत्तम पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा सम्यकवक्ता २०२४ चे आयोजन करताना त्यांच्या कृतीशील कार्याची प्रेरणा नव्या पिढीला मिळावी, युवा कार्यकर्त्यांना आंबेडकरी चळवळीत नवी सजगता यावी, आपले अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राखून आजच्या समाजव्यवस्थेत घडणाऱ्या अन्यायकारक घटनांविरूद्ध परखडपणे आवाज उठविण्याची ताकद निर्माण व्हावी. यासाठी नव्या दमाचे बुलंद वक्ते तयार व्हावेत असा आशावाद श्री.जाधव यांनी व्यक्त केला.
अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय सरचिटणीस सुनिल हेतकर,अपरान्त सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा.डाॅ.राजेंद्र मुंबरकर, दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे यांनीही सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देवून आजच्या समाजव्यवस्थेत कार्यकर्ता सतत अपडेट आणि समाजाभिमुख राहणे किती गरजेचे आहे. हे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी अपरान्त केंद्रीय सदस्य आणि सम्यक साहित्य संसद सदस्य कवी विठ्ठल कदम यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल तसेच कवयित्री संध्या तांबे यांना मैत्र साहित्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी प्रा.डाॅ.सोमनाथ कदम, कवी अरूण नाईक, गोपी पवार, किशोर कदम, सुधीर तांबे, निलेश पवार, अनिल तांबे , रुपाली कदम, विजय तांबे, संदेश कदम, रक्षा कदम, डाॅ.व्ही. जी.कदम आदी उपस्थित होते.
सम्यक युवा मंचचे कार्यकर्ते प्रतिक पवार,स्नेहल तांबे, स्नेहा कदम, प्रथमेश जाधव, अनिकेत जाधव यांनी स्पर्धेच्या आयोजनाची संपूर्ण जबाबदारी सांभाळली.
राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक पारितोषिक रु.१०,०००/- निलम उत्तम पवार पुरस्कृत
द्वितीय क्रमांक रु.७०००/- प्रवीण ओव्हळ पुरस्कृत
तृतीय क्रमांक रु. ५०००/- अजयकुमार सर्वगोड पुरस्कृत
उत्तेजनार्थ तीन क्रमांक प्रत्येकी १०००/- सुनील हेतकर पुरस्कृत
विजेत्यांना सन्मानचिन्हे पुरस्कृत सुनिल हेतकर आणि सम्यक युवा मंच यांजकडून घोषित करण्यात आली.
अंतिम निकाल पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक-चैतन्य कांबळे (कोल्हापूर)
द्वितीय क्रमांक-तेजस पाटील (पुणे)
तृतीय क्रमांक-अभय आळशी (मुंबई)
उत्तेजनार्थ १)सिद्धेश मिसाळे (कोल्हापूर)
२)मिथून माने (सातारा)
३)शुभम खरात-(कणकवली)
संपूर्ण राज्यभरातून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.विजेत्या स्पर्धकांना प्रायोजक आणि मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण प्राचार्य सागर माने, प्रा.कांता कांबळे आणि प्रा.डाॅ.सर्जेराव पद्माकर यांनी केले.उत्तम पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सुरुवातीस संदेश तांबे यांनी क्रांतीगीते सादर केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक पवार यांनी केले. तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश कदम आणि आभार सम्यक साहित्य संसद उपाध्यक्ष प्राचार्य सिद्धार्थ तांबे यांनी मानले.











