मर्डे ग्रामपंचायत नाव बदलासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसुरे मर्डे करावे अशी मागणी राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या जवळ मसुरे ग्रामविकास संघ मुंबईचे अध्यक्ष डॉ. दीपक परब यानी केली. दरम्यान याबाबत ग्रामविकास विभागाकडुन सकारात्मक निर्णय हॊण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असे पालकमंत्री नितेश राणे यानी आश्वासित केल्याची माहिती डॉ. दीपक परब यांनी दिली.

निवेदनात ते म्हणतात, मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतचे विभाजन झाल्या नंतर या ग्रामपंचायतचे नाव ग्रामपंचायत मर्डे असे शासन स्तरावरून बदलले गेले आहे. मसुरे हे ऐतिहासिक नाव त्यामुळे पुसले गेले आहे. याबाबत अधिकारी वर्गाचे लक्ष वेधले असता लोकसंख्येचे कारण सांगीतले जात आहे. वस्तुतः विभाजन प्रस्ताव वेळी मुळ ग्रामपंचायतचे नाव बदलू नये असा ठराव ग्रामसभेने त्यावेळी दिला होता. तसेच यापूर्वी कांदळगाव ग्रामपंचायतचे विभाजन होवून महान हि नवीन ग्रामपंचायत निर्माण झाली पण त्यावेळी कांदळगाव हे मुळ ग्रामपंचायतचे नावामध्ये बदल झाला नाही. कोळंब ग्रामपंचायत बाबत सुद्धा असा वेगळा निर्णय प्रशासनाकडून झाला नाही. त्यामुळे प्रशासनाकडून गावाचे नाव बदलून हा आमच्यावर अन्याय केला गेला आहे. प्रशासनाने केलेल्या तांत्रीक चुकीचा त्रास आम्हा मसुरे ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकार यांचे विभाग असलेल्या पोस्ट ऑफिस, महसूल इत्यादी ठिकाणी गावाचे नाव मसुरे आहे. निवडणूक ओळखपत्रावर मसुरे असा उल्लेख आहे. आणि ग्रामपंचायत नाव मात्र मर्डे आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मसुरे या नावाशी ऐतिहासिक वारसा, अस्मिता व भावनिक नाते आहे. परंतु नावा बाबतच्या गोंधळामुळे प्रशासकीय अडचणी जास्त वाढत आहेत. नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत निवडणूक आयोगाकडून आलेल्या मतदार यादीमध्ये सुद्धा मसुरे मर्डे असा उल्लेख होता. प्रशासनाने केलेल्या या गावाच्या तांत्रीक चुकी बाबत मागील काळात संबंधित मंत्री महोदय, कोकण विभाग आयुक्त यांचे सुद्धा लक्ष वेधले आहे.

कोकण आयुक्त, जिल्हा प्रशासना मध्ये सुद्धा याबाबत कुठलाही विरोध नसून शासनाच्या ग्राम विकास विभागाकडे याबाबत पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे मसूरे ग्रामविकास संगच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी परब सहकारी पतपेढीच्या वतीने अध्यक्ष डॉ दीपक परब यांनी मंत्री महोदयांचा सत्कार केला. यावेळी भाई परब, शैलेंद्र परब, सुजित परब उपस्थित होते. पालकमंत्री नितेश राणे यानी यावेळी परब पतपेढीचे विविध उपक्रम, कर्ज वसुली धोरण, सदस्य संख्या, कर्ज वसुली प्रमाण, पतपेढीचा एकूण नफा पतपेढीच्या शाखा याबाबत माहिती घेतली. कर्ज वसुली प्रमाण वाढविण्याचा सल्ला देताना पतपेढीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याची माहिती अध्यक्ष डॉ. दीपक परब यानी दिली.

error: Content is protected !!