
जुन्या परंपरा- समाजभान- व्यक्तिरेखा-अध्यात्म- जीवनमान आणि बरच काही जागवणारा लेखक विष्णू गांधी यांचा आठवण ग्रंथ प्रकाशित !
“इये फोंड्याचिये नगरी”- कणकवली / फोंडाघाट वासियांसाठी अभिमानास्पद अनुभव !
फोंडाघाट (कुमार नाडकर्णी) : दिवस- वर्ष- काळ पुढे जात राहतो. आणि मागे राहतात, आठवणी ! काही कटू तर काही सुखद ! मात्र त्या आठवणी, नव्या पिढीला मार्गदर्शक असतात. दीपस्तंभ असतात. म्हणूनच त्याचा इतिहास बनतो. त्या इतिहासातून गावची जडणघडण,त्यावेळच्या परंपरा, त्यातून मिळालेले संस्कार आणि नव्या पिढीपुढील सूर्योदय, अधिक सत्शील, प्रेरणादायी, आणि प्रकाशमान व्हावेत. माझे शाळाबंधू आणि फोंडाघाटचे सुपुत्र विष्णू गांधी यांनी आपल्या सहज सोप्या बाळबोध भाषेत ” इये फोंड्याचिये नगरी” मधून व्यक्तिरेखा- परंपरा- उत्सव- सामाजिक- राजकीय- समाजवाद- मनोवृत्तीचे चित्रण गावच्या आठवणी रूपात नुकतेच प्रकाशित केले.
” इये फोंड्याचिये नगरी ” पुस्तकाला अनुरूप नावही पद्मश्री मधुभाईंनी देऊन, चार चांद लावले आहेत .फोंडाघाट म्हणजे घाटावरच्या भाषेत ‘ पत्ता नसलेले गाव’! नावाप्रमाणेच गावातील व्यक्तीरेखातून, व्यवसायातून, राजकीय बाबीतून या वैरतेचे दर्शन ! सुमारे ६५-७० वर्षांपूर्वीचे फोंडा ! मात्र – परंपरा, अध्यात्म, देववाद , अथवा प्रसंगात सदैव फोंडेकरांची एकात्मता सिद्ध झाली किंवा होते. त्याकाळी दर रविवारी-सोमवारी फोंडा उतारपेठेत भरणारा गच्च बाजार! त्यामधून वावरणाऱ्या हाफ टनी मालगाड्यांचे चित्रण, चालीरीती, नाटके,टुरिंग टॉकीज मधील गमतीजमती हॉटेलातले आहे पदार्थ आणि त्यातून दरवळणारा सुवास, काही अफलातून व्यक्तिरेखा तर काही अंतर्मुख करणाऱ्या ! या मधुभाई नी आपल्या प्रस्तावनेची व्यक्त केल्या आहेत.आणि त्यानिमित्ताने कोकण आणि गाव आता सर्वार्थाने बदललय! गावपण उरलं नाही.सुबत्ता आली, पण नीतिमत्ता ढासळली. संपूर्ण महाराष्ट्राची हीच गत असताना, त्याचे प्रतिबिंब कोकणात फोंड्यात दिसते. फोंडा गाव ६०-७० वर्षांपूर्वी सुखात लोळत होता. हे वाचकांचा कान ओढून सांगण्यास मधुभाई विसरले नाहीत.
विष्णू गांधी यांनीही आपल्या सानिध्यात आलेल्या व्यक्तीचा- मधुभाई, प्रहार दैनिक, महेश केळुसकर, बापू नेरुरकर, संगीता सावंत, शशी डोरले, संपदा वागळे, आणि नाले उभयतांच्या संस्कारामुळे “इये फोंड्याचिये नगरी”प्रत्यक्षात जन्मास घालताना, प्रसूती वेदना जाणवल्या नसल्याचा आनंद व्यक्त केला. ६०-६५ वर्षांपूर्वीचा फोंडा आणि आत्ताचा यातील फरक पुढील पिढीस ज्ञात व्हावा, यासाठी शब्दरूपात निर्मितीचा उद्देश आपल्या मनोगतात मांडलाय …
” इये फोंड्याचिये नगरी “यात सर्वांग सुंदर ठेवा जपताना, वाचक रममाण होतो.माझ्या एनर्जीचा स्रोत- मधुभाई, आठवणीतील माणसं- बापूभाई शिरोडकर, दाजी सबनीस बाबासाहेब पटेल बापू नेरूरकर, गणपतीचे दिवस, दसरा सण मोठा, बालपणीची दिवाळी, मनात जपलेला फोंड्यातील पाऊस, आंब्याच्या मधुर सहवासात, तंबूतील सिनेमा, सरदार विश्रांतीगृह, तामटाचा बोळ, भजनी- कीर्तनी रंगले, मला घडविणारे गुरुजन, फोंड्यातील वाहनांची दुनिया, सोस, गेले ते दिन गेले,ते माझे घर अशा २४ भागातून फोंड्याची ६५-७० वर्षांपूर्वीच्या गावातील माणसे घडविणाऱ्या व्यक्तिरेखांच्या सहवासातील आठवणी,गुरुजनांच्या आठवणी विशद केल्या आहेत. त्या काळचे गणपती – दसरा – दिवाळी सणातील उत्साह, संस्कारवर्धक, चालीरीती, तंबूतील सिनेमांच्या रंजक आठवणी, गावाकडील हॉटेल मधल्या पदार्थांची आकर्षित करून घेणारी चव, वादग्रस्त पण आठवणीत राहणारा तांबटाचा बोळ, त्यावेळीची वाहनसुचिता, भजन- कीर्तनाचा ज्वर,गावातील राहाटी- पंचायतन इत्यादी अंगठीचा सोस आणि त्यातून घडलेल्या घटना यांचे समग्र चित्रण प्रत्येकाला आपल्याशी निगडित असल्याचे जाणवते. मग “गेले ते दिन गेले” म्हणत ते माझे घर आता मुंबईतून कसे अनुभवायचे ? असा प्रश्न सूर्यास्ताकडे निघालेल्या, तरीही सुमारे ६५ वर्षांपूर्वीचे जसेच्या-तसे आपल्या पुस्तकात चित्रण करणाऱ्या लेखक विष्णू गांधी यांना पडतो. लाईट नसताना कंदील आणि गॅस बत्ती, त्यातून टाळ्यांच्या कडकडाटात रममाण होणारे त्यावेळचे रसिक डोळ्यापुढून सरकतात. अबाल वृद्धांच्या संस्मरणीय व्यक्तिरेखा साकार होतात.गावातील घराच्या आठवणी जाग्या होतात. आज बदललेले घराचे रूप त्यातील नाती या साऱ्यातून मुक्त होताना कुणाबद्दलही किल्मिष नसल्याचे ते सांगतात. शेवटी फोंड्याच्या रम्य आठवणींचा नाद मनाच्या गाभाऱ्यात अखंड घुमत राहावा आणि ही ग्रंथसंपदा त्याकाळच्या स्वर्गाहूनही रम्य अशा फोंडा नगरीत घेऊन जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
वाचकांच्या पसंतीस नक्की उतरेल अशा ह्या आठवण ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच मुंबईमध्ये पार पडले. समस्त फोंडावासीयांना किंबहुना आजच्या युवाईला सार्थ अभिमान वाटावा अशा आपल्या आई-वडील ,आजोबा- आजींच्या वेळचा फोंड्याचा सुवर्णकाळ या ” इये फोंड्याचिये नगरी ” या पुस्तकातून अनुभवावयास नक्की मिळेल. कारण त्याकाळी रत्नागिरी- सिंधुदुर्ग, एकत्र जिल्ह्याचे राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक, समाजभान, विकास हा फोंडा केंद्रित होता. त्यामुळे ते अनुभव नक्कीच येणाऱ्या पिढीस मार्गदर्शक ठरतील. आणि अंतर्मुख होऊन पुन्हा एकदा त्यांना आपल्या बदलत्या काळातील “इये फोंड्याचिये नगरी” विकसित करण्यासाठी, लक्ष वेधतील असा विश्वास वाटतो.लेखक विष्णू गांधी यांना पुढील लेखनासाठी मनस्वी शुभेच्छा !!!











