बांधकाम कामगारांचे प्रस्ताव एका महिन्यात मंजूर करणार

चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरोग्य तपासणीची चौकशी होणार

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगार यांचे प्रलंबित लाभ प्रस्ताव एका महिन्यात मंजूर करण्यात येतील व चुकीच्या पद्धतीने केलेल्या आरोग्य तपासणीची चौकशी करून अहवाल मंडळ कार्यालयास सादर केला जाईल तसेच विविध प्रलंबित कामगार प्रश्नांवर नजिकच्या कालावधी कार्यवाही करुन कामगारांना न्याय देण्यात येईल असे सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी कामगार अधिकारी राजेश जाधव यांनी भारतीय मजदूर संघ पदाधिकारी यांच्या सोबत झालेल्या चर्चेदरम्यान स्पष्ट केल्याने दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी आयोजित केलेला संताप आक्रोश मोर्चा स्थगिती करण्यात येत असल्याची माहिती भारतीय मजदूर संघ जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगार व घरेलू कामगार यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत तसेच ठेकेदार एजन्सीच्या चुकीच्या कामकाजाबाबत तात्काळ कार्यवाही करून कामगारांना न्याय देण्यात यावा यासाठी भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग ओरस या ठिकाणी कामगारांचा संताप आक्रोश मोर्चा काढण्याचा निश्चय करण्यात आला होता. यास अनुसरून सिंधुदुर्ग जिल्हा सरकारी कामगार अधिकारी राजेश जाधव यांनी भारतीय मजदूर संघाच्या जिल्हा पदाधिकारी यांच्यासोबत दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत सिंधुदुर्ग ओरस येथे कामगार अधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करुन कामगारांचे प्रलंबित प्रश्न व ठेकेदार एजन्सीच्या भोंगळ कारभाराबाबत संघटनेचे म्हणणे ऐकून सविस्तर प्रदीर्घ चर्चा केली. या चर्चेदरम्यान भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव व बांधकाम कामगार महासंघ प्रदेश अध्यक्ष हरीभाऊ चव्हाण, जिल्हा अध्यक्ष सत्यविजय जाधव, बांधकाम कामगार महासंघ जिल्हा अध्यक्ष भगवान साटम, उपाध्यक्ष अशोक घाडीगांवकर, राजेंद्र आरेकर, कोषाध्यक्ष ओमकार गुरव, घरेलु कामगार संघ जिल्हा अध्यक्षा प्राची परब, दाजी घाडीगांवकर, मंगेश जगताप व पीडीत कामगार कुटुंबीय तसेच आरोग्य तपासणी ठेकेदार एजन्सी जिल्हाव्यवस्थापक प्रशांत जाधव, रिजनल मॅनेजर सुयोग दिक्षित, हर्षवर्धन कालेकर, दुकान निरीक्षक रविराज हुंबे, कन्ट्राटी कर्मचारी घनश्याम कुबल आदी उपस्थित होते.

नोंदीत बांधकाम कामगार आणि आपल्या लाभाचे सण 2023 – 24 व 2024 – 25 या वर्षाचे अर्ज ऑनलाईन केले असून ते फेब्रुवारी 2024 पासून प्रलंबित आहेत असे एकूण 6054 अर्ज पुढील एका महिन्याच्या कालावधीत मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. घरेलू कामगारांनी आपल्या नोंदणीचे अर्ज कामगार अधिकारी कार्यालयात सादर करून बऱ्याच महिन्यानंतरही त्यांना ओळखपत्रे व पावत्या मिळालेल्या नाहीत या संघटनेच्या मागणीच्या अनुषंगाने ओळखपत्रे व पावत्या तयार असून त्या संघटनेस प्राप्त होणार आहेत. तसेच मंडळ व शासनाने जाहीर केल्यानुसार नोंदीत घरेलू कामगारांना संसार उपयोगी भांडी संच याबाबत कामगार अधिकारी कार्यालयाकडून मागणी करण्यात आली आहे प्राप्त होताच संघटनेस विश्वासात घेऊन त्याचे वाटप करण्यात येईल असा निर्णय झाला. सन्मानधन व प्रसुती लाभ बाबत लवकरच मंडळाकडून कागदपत्रांची माहिती घेण्यात येईल व संघटनेस उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला.

त्याचबरोबर बांधकाम कामगार यांचे सण 2019 -20 चे ऑफलाइन लाभ अर्ज मृत्यू क्लेम तसेच कोरोना कालावधीतील प्रलंबित आर्थिक मदत, प्रलंबित प्रशिक्षण भत्ता, अवजारे खरेदी करताचे अनुदान व ऑनलाईन प्रक्रियेमधील बदल याबाबत मंडळ कार्यालयाशी फेर प्रस्ताव सादर करण्यात येईल व त्याचा कामगार अधिकारी कार्यालयामार्फत पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील असा निर्णय झाला. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नोंदी बांधकाम कामगारांची ठेकेदार कंपनीमार्फत जी आरोग्य तपासणी केली आहे त्या अनुषंगाने मागील तपासणीची चौकशी करून दोषींवर कारवाईसाठी मंडळ कार्यालयास अहवाल सादर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला भारतीय मजदूर संघ पदाधिकारी कामगार अधिकारी कार्यालय व ठेकेदार एजन्सीज यांची एकत्रित प्रदीर्घ चर्चा होऊन कामगारांचे प्रलंबित प्रश्न व ठेकेदार एजन्सीच्या मागील कारभाराबाबत कारवाई व सुसूत्रता आणण्याच्या दृष्टीने समाधानकारक निर्णय झाले. कामगार अधिकारी यांच्याकडून संघटना पदाधिकारी यांना विहित मुदतीत सर्व कार्यवाही करणार असल्याचे सांगितल्यानुसार भारतीय मजदूर संघातर्फे 2 जानेवारी 2025 रोजी आयोजित संताप आक्रोश मोर्चा तूर्तास स्थगित करण्यात येत आहे. पूर्तता न झाल्यास फेब्रुवारी 2025 मध्ये आंदोलनाचे हत्यार उपसण्यात येईल असा इशाराही देण्यात आल्याची माहिती जिल्हा सचिव हेमंतकुमार परब यांनी दिली.

error: Content is protected !!