कणकवली (प्रतिनिधी) : विमनस्क अवस्थेत फिरणाऱ्या दुर्जन रिदास (वय सुमारे ३० वर्षे) या युवकाचे रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्याचे नातेवाईक, गाव आदीबाबतचा तपशिल अद्याप सापडून आलेला नाही. तरी सदरच्या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
दुर्जन रिदास या नावाने ओळखला जाणारा सदरचा मनोरुग्ण कणकवली नांदगाव येथे फिरताना आढळला होता. त्याची प्रकृती अत्यवस्थ असल्याने ग्रामस्थांनी त्याला अधिक औषधोपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याला अधिक उपचारासाठी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी शासकीय जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलविण्यात आले होते. मात्र तेथे औषधोपचार सुरू असताना रिदास याचे ६ डिसेंबर २०२४ रोजी निधन झाले. मात्र त्याच्या नातेवाईक, नावागावाचा पत्ता सापडून आला नाही. रिदास याची उंची सुमारे पाच फूट असून, वर्ण सावळा आहे. त्याच्या उजव्या हातावर बदामाचे चित्र असून त्यावर इंग्रजीत ‘लव्ह’ असे गोंदलेले आहे. तर डाव्या मनगटावर अस्पष्ट असे चित्र गोंदवलेले आहे. तरी याबाबत कोणाला काही माहिती असल्यास कणकवली पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास कणकवलीचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार एस. एस. शिवगण करीत आहेत.