वैकुंठवासी बुवा चिंतामणी पांचाळ यांच्या स्मारकाचे 18 जानेवारी रोजी अनावरण

शिष्यवर्गाने उभारले “स्वरचिंतामणी” स्मारक अनावरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे स्मारक समितीचे आवाहन

कणकवली (प्रतिनिधी) : कोकणाला संत परंपरेचा मोठा वारसा आहे.धार्मिक क्षेत्रात योगदान दिलेले असंख्य भजनी बुवा तसेच वारकरी या भूमीत जन्माला आले.भजन-कीर्तनच्या माध्यमातून या थोर मंडळींनी ईश्वरी भक्ती सोबत समजप्रबोधन करीत कोकण भक्तीमय केले.हाच वारसा जपत भजनमहर्षी वैकुंठवासी चिंतामणी पांचाळ बुवा यांनी कोकणातील भजन क्षेत्राला आदर्शवत दिशा दिली.कोकणात भजन शिकवणी वर्गाचा पाया देखील त्यांनी रचला.भजन कलेचा प्रचार-प्रसार करीत भक्तीभावाची ओढ सर्वत्र त्यांनी निर्माण केली.अनेक शिष्यगण त्यांनी घडविले.स्वरांशी अत्यंत जवळची मैत्री असलेले भजनी बुवा अशी त्यांची ओळख निर्माण झाली.इतकी पारंगतता त्यांनी या कलेत निर्माण केली.चिरंतर अजरामर राहणारी भजनी गिते त्यांनी स्वरबद्ध केली.भजनात विशिष्ट प्रकारची गोडी निर्माण करून या क्षेत्रात त्यांनी क्रांती घडविली.”असाध्य ते साध्य करिता सायास,”कारण अभ्यास तुका म्हणे”असा यशस्वी मंत्र त्यांनी शिष्यवर्गाला दिला.आज मुंबई-कोकणासह संपूर्ण राज्यभरात असंख्य शिष्यपरिवार त्यांचा वारसा अविरत पुढे नेत आहेत.अश्या या थोर भजन क्षेत्रातील रत्नाची आठवण सदैव रहावी यासाठी सर्व शिष्य गणांच्या संकल्पनेतून आणि सामाजीक दात्यांच्या सहकार्यातून नेत्रदीपक अश्या “स्वरचिंतामणी” या स्मारकाची उभारणी करण्यात आलेली आहे.

शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी सकाळी 10.30 वाजता या स्मारकाचे अनावरण गं.भा जयश्री चिंतामणी पांचाळ यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.तत्पूर्वी सकाळी 8.30 वाजता श्री.गणेश पूजन,वास्तुपूजन,अभिषेक आदी धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. तसेच सकाळी 11 वाजता मान्यवरांचे सत्कार व मनोगत यासाठी व्यासपीठाय कार्यक्रम संपन्न होणार आहे.दुपारी 12 नंतर “भजन पुष्पांजली” कार्यक्रम पार पडेल.दुपारी 1 वाजता स्नेहभोजन तर सायंकाळी 7 वाजता वारकरी सांप्रदाय सिंधुदुर्ग यांस कडून हरिपाठ कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.रात्रौ 8 वाजता ह. भ.प विश्वनाथ गवंडळकर महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे.

सर्व भजन रसिकांनी “स्वरचिंतामणी” या स्मारक अनावरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन स्मारक समिती अध्यक्ष निलेश ठाकूर,उपाध्यक्ष योगेश पांचाळ,सचिव संतोष पालव,खजिनदार संजय चव्हाण आणि संपूर्ण स्मारक बांधकाम समिती तसेच शिष्य परिवार आणि पांचाळ कुटुंबीय यांस कडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!