कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने मनोरुग्ण व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी विशेषता रस्ते, पर्यटन स्थळ, बस स्थानक, रेल्वे स्थानक, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी आढळणाऱ्या मनोरुग्ण व्यक्तींवर उपचाराच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येत आहे. गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशाच चार व्यक्तींना उपचारासाठी रत्नागिरी येथे नेण्यात आले. याकामी नागपूर येथील टीडब्ल्यूजे फाउंडेशन या संस्थेची मोलाची मदत होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या संकल्पनेतून अशा मनोरुग्ण व्यक्तींचे पुनर्वसन होण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. त्यांच्यात संकल्पनेतूनच गुरुवारी सावंतवाडी, कुडाळ व कणकवली तालुक्यात आढळलेल्या विमस्क पुरुष रुग्णांना जिल्हा रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेने रत्नागिरी येथे पाठविण्यात आले. या रुग्णांना स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या सूचनेनुसार कणकवली पोलीस ठाण्यात नोंद करून पुढे रत्नागिरी येथे नेण्यात आले. यावेळी टीडब्ल्यूजे फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही रुग्णांना केस व दाढी करून नवीन कपडेही परिधान केले. कणकवली पोलीस ठाण्यात एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक गुरुनाथ कोयंडे, कणकवली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद देठे, हवालदार सुभाष शिवगण, महिला पोलीस विनया सावंत, राज आघाव तसेच टीडब्ल्यूजे फाउंडेशन, नागपुरचे व्यवस्थापक सुमंत नारायणराव ठाकरे, सहायक, आशिष कांबळे, मानवता संयुक्त संघ, रत्नागिरी अध्यक्ष सचिन शिंदे, सिंहगर्जना युवा मंच, नाशिकचे प्रितम भामरे आदी सर्व मोहीम मध्ये होते.