ASPM कॉलेज ऑफ फार्मसी यांचा पुढाकार
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्युनियर कॉलेज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स तसेच ए एस पी एम कॉलेज फार्मसी संगुळवाडी ता.वैभववाडी यांच्या पुढाकाराने व या शैशणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने खारेपाटण हायस्कूल येथे नुकतेच शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत हे मोफत आरोग्य तपासणी शिबिर खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये पार पडले. यामध्ये बॉडी मास इंडेक्स,रक्त गट तपासणी,ब्लड प्रेशर तपासणी व रक्त शर्करा तपासणी करण्यात आली. एकूण १०० विद्यार्थ्यांची तपासणी या आरोग्य शिबिरात करण्यात आली. या शिबिराचे आयोजन ASPM कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रथम वर्षातील विद्यार्थी,असिस्टंट प्रोफेसर व एन.एस.एस. प्रमुख अक्षय नर सर व शेठ न. म. विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी प्राध्यापिका चैत्राली वरूणकर मॅडम यांच्या मार्गर्शना खाली करण्यात आले होते.
या कॅम्पचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या आरोग्य निर्देशकांबद्दल जाणीव करून देणे आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्यासाठी मोफत सेवा प्रदान करणे आणि जर निर्देशांक सामान्य पातळीवर नसल्यास आवश्यक उपाययोजना करून घेण्याकरता योग्य ते मार्गदर्शन करणे हा होता. यावेळी खारेपाटण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सेक्रेटरी महेश कोळसुलकर, खारेपाटण हायस्कूलचे मुख्यध्यापक संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका प्रा. महिंद्रे मॅडम यांनी संगुळववाडी ए एस पी एम फार्मसी कॉलेजच्या प्राध्यापिका चैत्राली वरुणकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.व शाळेच्या वतीने आभार मानले.