आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात मेजर कौस्तुभ रावराणे बंदिस्त प्रेक्षागृहाचे उद्घाटन
वैभववाडी (प्रतिनिधी) : समाजातील प्रत्येक पिढीला आदर्श वाटावा असे काम हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांनी केले आहे. तालुक्यातील सडुरे गावचे ते सुपुत्र होते, त्यांचे कार्य तरुणांमध्ये नेहमी प्रेरणादायी ठरावे यासाठी वैभववाडी- सडुरे, नावळे रस्त्याला कौस्तुभ रावराणे मार्ग नाव देणार, त्याचबरोबर मार्गावर शहरात भव्य प्रवेशद्वार उभारणार असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थाही विविध उपक्रम राबवत आहे. आर्दश विदयार्थी घडविणारी ही मोठी शिक्षण संस्था आहे. संस्था सुरु करणे सोपे आहे. परंतु ती वाढविणे व आदर्शवत काम करणे खूप अवघड काम आहे. हे काम या संस्थेने पशस्वीपणे केले आहे. अशा संस्थांच्या योगदानामुळेच आज महाराष्ट्रात कोकण पॅटर्नचा डंका असल्याचे नितेश राणे यानी सांगितले. तर क्रिडा संकुलाच्या कंपाऊड वॉलसाठी न. पं. च्या माध्यमातून ऐशी लाख इतका निधी देणार असेही सांगितले. येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणेबंदिस्त प्रेक्षागृह, कै. सदाशिव रावराणे शैक्षणिक संकुलाचे नामफलक अनावरण व महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्र यांच्या उद्घाटन व हस्तांतरण सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार नितेश राणे बोलत होते.
यावेळी संस्था अध्यक्ष विनोद तावडे, माजी आमदार अजित गोगटे, प्रमोद जठार, कौस्तुभ रावराणे यांच्या आई ज्योती व वडील प्रकाशकुमार रावराणे, भालचंद्र रावराणे, कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, सचिव शैलेश रावराणे व संस्था पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. महाराणा प्रतापसिंह जीवन विकास केंद्र या सभागृहाचे उदघाटन आमदार नितेश राणे व विनोद तावडे यांच्या हस्ते पार पडले.