खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय प्रजासत्ताक दिनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे विश्वस्त विजय जयराम देसाई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खारेपाटण हायस्कूलच्या इयत्ता दहावी १९८०-८१ बॅच मधील विद्यार्थ्यांनी सलग तिसऱ्या वर्षी एकत्र येत गेट टुगेदर कार्यक्रम खारेपाटण हायस्कूल येथे नुकताच संपन्न झाला.
याप्रसंगी या बॅचच्या एकूण २५ माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून विजय देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर माजी विद्यार्थ्यानी शाळेच्या परिसरास भेट देऊन आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. सदर बॅचच्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी प्रशालेतील एक वर्गखोली सुमारे २ लाख रुपये खर्च करून नूतनीकरण करून दिली.
यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या विद्यार्थ्यापैकी विजय जयराम देसाई, मोहन भास्कर कावळे, आणि रवींद्र सिताराम मण्यार यांनी प्रत्येकी ११०००/- याप्रमाणे प्रशालेला रोख रक्कम रु. ३३०००/- देणगी स्वरूपात दिली.
तसेच शालेय परिसरात बैठक व्यवस्थेसाठी दोन बेंच उपलब्ध करून दिल्या. भविष्यात आणखी आर्थिक मदत करण्याचं आश्वासन प्रशालेचे विश्वस्त विजय जयराम देसाई यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले. खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे उपाध्यक्ष भाऊ राणे सचिव महेश कोळसुलकर संस्थेचे सर्व विश्वस्त, प्रशालेचे प्राचार्य संजय सानप, पर्यवेक्षक संतोष राऊत यांनी या बॅचच्या विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले.