वैभववाडी नगरपंचायत ठेकेदारी राड्याला वेगळे वळण
वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंच्यायतीच्या ठेकेदारीवरून झालेल्या राड्याला वेगळे वळण लागले आहे. गुरुवारी रात्री उशिरा भाजपा नगरसेवक राजन तांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या चौघावर ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर भाजपाच्या १४ पदाधिकाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राडा प्रकरणी परस्पर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे वैभववाडीतील राजकीय वातावरण तापले आहे.
वाभवे वैभववाडी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे.या निविदा भरताना काही ठेकेदारांच्या निविदेमध्ये त्रुटी राहिल्या होत्या. या त्रुटीची पूर्तता करण्याचे पत्र नगरपंचायत प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना दिले होते. त्यानुसार विष्णू राठोड नमक ठेकेदार प्रतिज्ञापत्र करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात जात होते. त्यांच्या सोबत अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर या होत्या. बाहेरील ठेकेदार नगरपंचायतीची निविदा भरीत असल्याची माहिती भाजप पदाधिकाऱ्यांना मिळाली होती. या ठेकेदाराला स्थानिक ठेकेदार व सत्ताधारी पदाधिकाऱ्यांचा विरोध होता. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाकडे जाणाऱ्या विष्णू राठोड नामक ठेकेदाराला सत्ताधारी नगरसेवकांनी निविदा भरण्यापासून रोखले. या निविदा भरण्यावरून भाजप व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला होता.
दरम्यान या राड्यानंतर सत्ताधारी नगरसेवक राजन वसंत तांबे (50 रा. तांबेवाडी वैभववाडी) यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांविरोधात ॲक्ट्रॉसीटीची तक्रार दाखल केली. त्यानुसार महाविकास अपक्ष नगरसेविका अक्षता जैतापकर, उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका प्रमुख रवींद्र चव्हाण व ठेकेदार विष्णू राठोड यांच्या वर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कलम 3(1), (R)(S) भारतीय दंड संहिता कलम 131(2), 352, 3, (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीवाचक शब्द वापरून, अपमाणित करून तसेच ढकलबुकली करून ठार मारण्याची धमकी दिल्याचे तांबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.
तर महाविकास आघाडीच्या एका नगरसेविकेने भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात विनय भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार भाजप पदाधिकारी व सत्ताधारी नगरसेवक यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात माजी नगरसेवक संतोष पवार, नगरसेवक प्रदीप रावराणे, अक्षय मोहिते, आबा लसणे, नगरसेवक विवेक रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, शुभम रावराणे, आदित्य चव्हाण, गणेश मोहिते, उपनगराध्यक्ष संजय सावंत, भाजपा माजी तालुकाध्यक्ष नासिर काझी, माजी उपसभापती भालचंद्र साठे, नगरपंचायत बांधकाम सभापती रणजीत तावडे, भाजप तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे अशा 14 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी घनशाम आढाव करीत आहेत.