पुरस्काराने जबाबदारी आणखी वाढली !

दीक्षित फाउंडेशनचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रसाद बागवे यांना प्रदान

मसूरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्याच्या ग्रामीण भागात अनेक शिक्षक पुढील पिढी घडविण्यासाठी झोकून देऊन कार्य करत आहेत. अशा शिक्षकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. अनेक शिक्षक यातून प्रेरणा घेऊन ज्ञानदानाचे आपले कार्य आणखी मोठ्या उंचीवर नेतील असे प्रतिपादन दीक्षित फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी येथे केले. दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचारमंच, देवगड यांच्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कुल येथे करण्यात आले होते.

यावेळी ते बोलत होते. दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचारमंच, देवगडचा आदर्श शिक्षक (माध्यमिक विभाग ) पुरस्कार श्री भगवती हायस्कुल मुणगेचे तत्रस्नेही व अष्टपैलू सहा. शिक्षक प्रसाद बागवे यांना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, पु. ज.ओगले, माजी आमदार अजित गोगटे, भाई बनकर, अनंत करंदीकर, प्रकाश गोगटे, अध्यक्ष नारायण माने, समन्वयक हिराचंद तानावडे, माधव यादव, नम्रता तावडे, सुजाता गोगटे, सदानंद पवार, हेमंत आईर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना प्रसाद बागवे म्हणाले, हा सत्कार माझा एकट्याचा नसून माझे सर्व विद्यार्थी, सहकारी शिक्षक आणि आई-वडील यांचा आहे. माझ्या शैक्षणिक कार्यात पत्नी प्रणिधी हीचा सुद्धा भक्कम पाठिंबा मला लाभत आहे. देवगड तालुका शैक्षणिक दृष्ट्या जिल्ह्यात पुढे असावा यासाठी दीक्षित फाउंडेशनचे मोठे कार्य चालू आहे.

या फाउंडेशनच्या पुढील उपक्रमाला ज्या ठिकाणी माझी गरज भासेल त्या ठिकाणी मी उपलब्ध असेन. भविष्यात अधिक चांगले काम करून या पुरस्काराची शान आणखी वाढवण्याचा माझा प्रयत्न असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जेष्ठ शिक्षक प्रणय महाजन, तसेच गुरुप्रसाद मांजरेकर, प्रणिधी प्रसाद बागवे, झुंजार पेडणेकर यांनी प्रसाद बागवे यांचे अभिनंदन केले. आभार संजय गोगटे, सूत्रसंचालन सुनील जाधव यांनी केले.

error: Content is protected !!