तळेरे (स्वप्नील तांबे) : येथील रस्त्यासाठी सोमवार, १० फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा ओझरम बौद्धजन मंडळाचे सचिव सुरेश तांबे यांनी दिला आहे. तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे, ओझरम बौद्धवाडीतील रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे शाळकरी मुले, ग्रामस्थ यांना वाहतुकीसाठी समस्या निर्माण होते. याबाबत अनेकवेळा मागणी करूनही दुर्लक्ष करण्यात आले. या रस्त्याचे काम मार्गी लागावे, यासाठी १० रोजी बौद्धजन मंडळ आणि सावित्रीबाई फुले महिला मंडळ, ओझरम यांच्यावतीने ग्रा.पं. कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार आहे.
