पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांची माहिती
कणकवली (प्रतिनिधी) : प्रत्येक भारतीय नागरिकाला गौरव आणि अभिमान वाटेल अशी “स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा”कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघाच्या वतीने ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता कणकवली येथे दैदिप्यमान स्वरूपात काढली जाणार आहे. या यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन चरित्राचे देखावे, चित्ररथ त्याचप्रमाणे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे दाखवली जातील. त्याचप्रमाणे वीर सावरकर यांच्या जीवनावर पथनाट्य सादर केली जातील. ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा शिवसेना – भाजपा युती आणि समविचारी पक्ष यांच्या वतीने भव्य स्वरूपात काढली जाणार असून मतदारसंघात सर्वत्र भगवे वातावरण केले जाणार आहे.अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा प्रमुख (ठाणे ते सिंधुदुर्ग ) भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना भाजपा कणकवली मतदार संघाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना – भाजप संयुक्त पत्रकार परिषद कणकवलीत प्रहार भवन येथे झाली. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,सेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर,भाजपचे तालुकाप्रमुख मिलिंद मेस्त्री, माजी सभापती मनोज रावराणे, उपतालुकाप्रमुख दामू सावंत आदी उपस्थित होते.
आमदार नितेश राणे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली त्यानंतर ही यात्रा राज्याच्या कानाकोपऱ्यात काढण्याचे निश्चित करण्यात आले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकतीस मार्च ते सात एप्रिल यादरम्यान महाराष्ट्रात ही यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात काढली जाणार आहे. त्यासाठी शिवसेना भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणारे समाजातील सर्वच घटक या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. या यात्रेसाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे लोकसभा संपर्कप्रमुख आमदार रवी फाटक यांना व शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी,नेते या सर्वांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे यावेळी आमदार झाल्याने सांगितले.
कणकवली मतदार संघाची वीर सावरकर गौरव यात्रा ५ एप्रिल रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत कणकवलीतून काढली जाणार आहे. त्यासाठी मतदारसंघातील कानाकोपऱ्यातून जनता,कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. ही गौरव यात्रा प्रत्येकाला अभिमान वाटेल स्वाभिमान उंचावेल अशीच दैदिप्यमान होईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला.