कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या विद्यमाने कणकवली बस स्थानकावर “रस्ता सुरक्षा अभियान २०२३” नुसार “सडक सुरक्षा, जीवन रक्षा!” या विषयावर प्रबोधनात्मक पथनाट्य सादर करण्यात आले. बस स्थानकातील प्रवाश्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गचे सहायक मोटार वाहन निरीक्षक अभिजित शिरगावकर आणि नितिन पाटील यांनी उपस्थित प्रवाशांना वाहतुकीचे नियम, कायदे, हेल्मेट वापरण्यामुळे होणारे फायदे, भ्रमरध्वनी चूकीच्या वापरामुळे होणारे अपघात, वाहन चालविताना घ्यावयाची दक्षता, पावसाळ्यात चालकाने घ्यावयाची काळजी, घाट चढताना आणि उतरताना गिअरचा वापर, वाहनाची देखभाल आदर्श वाहन चालकाची कौशल्य, जबाबदारी आणि एकाग्रता, मद्य प्राशनाचे दुष्परिणाम आणि पादचार्यांचे नियम याबाबत उपस्थित प्रवाशांना मार्गदर्शन केले. तसेच वाहन चालविताना घरी आपली कुणीतरी वाट पाहतात याचे भान ठेवताना त्या दृष्टीने सुरक्षित वाहन चालविणे आदी बाबत मार्गदर्शन केले. यासाठी सूचना देणारे फलकही वापरण्यात आले.
या पथनाट्याला कणकवली बस स्थानकाचे आगर व्यवस्थापक वैभव पडोळे, सुरक्षा व दक्षता अधिकारी डी. के. मदने, सहायक वाहतूक निरीक्षक पी. एस. परब, वाहतूक निरीक्षक डी. आर. चव्हाण, सुरक्षा रक्षक एम. आर. राणे, स्थानकातील पाॅपकाॅर्न सेंटरचे परवानाधारक, ज्येष्ठ पत्रकार गणपत तथा भाई चव्हाण यांनी सहकार्य केले.