सदस्यांनी गोळा केला ७०० किलो पेक्षा अधिक कचरा !
तळेरे (प्रतिनिधी) : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येण्याऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमामुळे या प्रतिष्ठानचे कार्य संपूर्ण जगभरात पोहचले आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून वेळोवेळी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण व संवर्धन, विहिरी नद्या साफसफाई, जल पुनर्भरण, पाणपोई, बंधारा उपक्रम, शैक्षणिक साहित्य वाटप व स्वच्छता अभियान असे अनेक समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. याचीच दखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी आदरणीय डॉ. दत्तात्रेय नारायण तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छ भारत अभियानाचे स्वच्छतादूत म्हणून नियुक्त केले.
आपल्यावर या मातृभूमिचे या देशाचे तसेच या समाजाचे ऋण आहे.ते ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवा भाव अंतरी रुजू केला पाहिजे आणि याच श्रीसेवेतून या ऋणातून मुक्तता होईल. यासाठी आदरणीय डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान संपूर्ण देशभर तसेच देशाबाहेर स्वच्छतेचा जागर करत आहेत. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हाती घेतलेल्या देशव्यापी स्वच्छता अभियान कार्यक्रम दिनांक ०२ मार्च २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजल्या पासून संपूर्ण भारत भर राबविण्यात आला. याच स्वच्छता अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील श्री महालक्ष्मी मंदीर व श्री विठ्ठलादेवी मंदीर परिसर,श्री देव चव्हाटा परीसर या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानाअंतर्गत वरील ३ ठिकाणावर एकूण ४८ सदस्य उपस्थित होते व अंदाजे ७०० किलो कचरा संग्रहित करून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या कार्यक्रमामध्ये कासार्डे गावातील देवस्थान कमिटी चा सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले. या कार्यामागे साहजिकच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष पद्मश्री पुरस्कार सन्मानित डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचे मार्गदर्शन त्यांनी दिलेले विचार आणि सामाजिक सेवेचा वसा व प्रेरणाशक्ती निश्चितच कारणीभूत आहे.
